फडणवीस, अजित दादा यांच्या पहाटेच्या शपथविधीच्या मागे शरद पवारच? टीव्ही9 स्पेशल रिपोर्ट

| Updated on: Feb 15, 2023 | 12:24 AM

अजित पवारांसोबतचा शपथविधी शरद पवारांशी चर्चेनंतरच झाला, असं ऑन कॅमेरा फडणवीस म्हणालेत. पाहुयात पहाटेच्या शपथविधीवर गौप्यस्फोट करणारा हा स्पेशल रिपोर्ट

फडणवीस, अजित दादा यांच्या पहाटेच्या शपथविधीच्या मागे शरद पवारच? टीव्ही9 स्पेशल रिपोर्ट
sharad pawar
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : TV9 मराठीच्या महाराष्ट्राचा महासंकल्प या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांनी गौप्यस्फोट केला. महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली. पहाटेच्या शपथविधीवरुन आतापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा फडणवीसांनी त्यांच्या बाजूनं केलाय. अजित पवारांसोबतचा शपथविधी शरद पवारांशी चर्चेनंतरच झाला, असं ऑन कॅमेरा फडणवीस म्हणालेत. पाहुयात पहाटेच्या शपथविधीवर गौप्यस्फोट करणारा हा स्पेशल रिपोर्ट

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांच्याच संमतीनं पहाटेचा शपथविधी झाला, असा राजकीय बॉम्बच फडणवीसांनी टाकला. tv9च्या महाराष्ट्राचा महासंकल्प या कार्यक्रमात, उपमुख्यमंत्री फडणवीसांनी आतापर्यंतचा सर्वात मोठा गौप्यस्फोट केला. अजित पवारांसोबतच्या पहाटेच्या शपथविधीवर फडणवीस थेट पणे बोलले. शरद पवारांशीच बोलणी झाली होती, असं फडणवीसांनी tv9च्या कार्यक्रमात सांगितलंय.

पहाटेच्या शपथविधीवरुन महाराष्ट्रच नाही तर देशभरातील राजकीय पंडितांच्या मनात अनेक सवाल होते. पण फडणवीसांनी TV9च्या कॉनक्लेव्हमध्ये असा काही गौप्यस्फोट केला..की वेगवेगळ्या वर्तमानपत्रांची हेडलाईन्सही तीच झाली. फडणवीसांनी शरद पवारांसोबत ठरलं होतं म्हटल्यावर, पवारांची प्रतिक्रिया येणं स्वाभाविक होतं. पवार माध्यमांसमोर आले आणि फडणवीसांनी असत्याचा आधार घेतल्याचं सांगत दावा फेटाळला.

2019 च्या विधानसभा निकालानंतर, अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदावरुन उद्धव ठाकरेंचं भाजपसोबत फिस्कटलं. त्यामुळं ठाकरेंनीही कट्टर काँग्रेस राष्ट्रवादीशी बोलणी सुरु केली होती…एकीकडे महाविकास आघाडीची निर्मिती होत होती..त्याचवेळी रातोरात चक्र बदलून, फडणवीस आणि अजित पवारांनी पहाटेचा शपथविधी करत उद्धव ठाकरेंना जबर धक्का दिला होता. अजित पवारांचा हा प्रमाणिक प्रयत्न होता, असंही फडणवीस म्हणतायत..

फडणवीसांच्या गौप्यस्फोटानंतर पवारांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळेंनीही, ये उम्मीद नहीं थी म्हणत दावा फेटाळला. फडणवीसांनी शरद पवारांशीच बोलणी झाली होती असं म्हटल्यावर, काही दिवसांआधीच अजित पवारांचं वक्तव्यही पुन्हा चर्चेत आलंय. राष्ट्रपती राजवट हटवण्यासाठी पवारांचीच खेळी होती असा आपला कयास आहे असं स्वत: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले होते..

आता जयंत पाटलांच्या या वक्तव्यानंतर संजय राऊतही सूचक बोललेत..राष्ट्रपती राजवट हटवणं सोपं नव्हतं, असं राऊतांनी म्हटलंय. पहाटेच्या शपथविधीवर बोलताना फडणवीसांनी पवारांचं नाव घेतलं. त्याचवेळी त्यांनी अजित पवारांना तोंडघशी कोणी पाडलं असा सवाल करत, पुन्हा बोट शरद पवारांकडेच दाखवलं…त्यानंतर सुप्रिया सुळेंपाठापोठ नातू रोहित पवारही मैदानात उतरलेत.

विशेष म्हणजे गेल्याच आठवड्यात अजित पवारांनी TV9लाही मुलाखत दिली. दादांना पहाटेच्या शपथविधीवरुन विचारलंही पण काही प्रश्नांवर नो कंमेंट्स म्हणत, एका प्रश्नावर त्यांनी वरिष्ठच निर्णय घेतात असं म्हटलं होतं. पहाटेचा शपथविधी का झाला त्याचं कारणही फडणवीसांनी सांगितलंय. उद्धव ठाकरेंनीच विश्वासघात केला. त्यामुळं व्याजासह परतफेड केल्याचं फडणवीस म्हणतायत.

फडणवीस फक्त पहाटेच्याच शपथविधीवर बोलले असं नाही..तर भाजपला कमजोर करण्यासाठी शिवसेनेचं राष्ट्रवादी सोबत 2019च्या निवडणुकीतच साटंलोटं झालं होतं. त्यासाठीच बंडखोर उमेदवार करुन भाजपचेच उमेदवार पाडले असा गंभीर आरोपही फडणवीसांनी केलाय.

देवेंद्र फडणवीसांनी एकापाठोपाठ एक गौप्यस्फोट आणि दावे केलेत आणि यापुढंही त्यांनी आणखी गौप्यस्फोट करण्याचा इशाराही दिला. त्यामुळं फडणवीस यापुढंही मोठ मोठे राजकीय गौप्यस्फोट करण्यासाठी तयार आहेत. आता तो गौप्यस्फोट काय असेल ?…यावरुन पुन्हा फडणवीसांनी उत्सुकता वाढवलीय.