लोकसभेच्या निवडणुकीचं पाचव्या टप्पातील मतदान येत्या 20 मे म्हणजे सोमवारी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांच्या प्रचारतोफा धडाडण्यासाठी आता सुरूवात झाली आहे. भिवंडीमधील सभेमध्ये बोलताना शरद पवार यांनी मोठा दावा केला आहे.
आज नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी ठिकाठिकाणी सांगत आहेत की, आम्हाला ४०० पेक्षा अधिक जागा हव्या आहेत. का तर त्यांना देशाची घटना बदलायची आहे. कर्नाटकातील त्यांच्या एका खासदाराने जाहीरपणे घटना बदलायचं सांगितलं. उत्तर प्रदेशातील त्यांच्या खासदारानेही घटना बदलायचं सांगितलं आहे. राजस्थानमधील नेत्यानेही तेच सांगितलं. त्यासाठी मोदींना मतं द्यायचं आहे. बाबासाहेबांनी दिलेला अधिकार संपवला जाईल, तेव्हा तुमच्यासारख्या कोट्यवधी लोकांचं अधिकाराचं अस्तित्व नष्ट होईल. त्या दिवशी देशात हुकूमशाही येईल, असं शरद पवार म्हणाले.
आज या देशाच्या राज्यातील शेतकरी संकटात आहे. कष्टकरी कामगार संकटात आहे. अल्पसंख्यांकांची स्थिती अवघड केली आहे. पंतप्रधान चुकीच्या पद्धतीने मंगळसूत्रावर बोलत आहे. उद्या आमच्या हातात सत्ता आली तर अयोध्येतील मंदिर संकटात येईल असं मोदी सांगत आहे. या देशातील मंदीर, मशीद, चर्च असो की इतर प्रार्थनास्थळं हे सुरक्षित आहेत. सुरक्षित राहील. पण मोदी काही कारण नसताना या विषयाला हात घालत आहेत. हे चुकीचं आणि गंभीर असल्याचं पवारांनी म्हटलं आहे.
लोकसभेच्या निवडणुकीसाठी मोठ्या संख्यने तुम्ही उपस्थित आहात. या निवडणुकीतून तुमच्या माझ्या भविष्याचं नियोजन व्हायचं आहे. चिंतेची स्थिती ही आहे की, ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांना संधी मिळाली तर तुमचा मताचा अधिकार संकटात आल्याशिवाय राहणार नाही. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिलं, त्या घटनेने तुम्हाला अधिकार दिल्याचं शरद पवारांनी सांगितलं.