शनिवारी महाराष्ट्र बंदची हाक महाविकास आघाडीने दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी नुकतीच पत्रकार परीषद घेत कडकडीत बंद पाळण्याचे आवाहन राज्यातील जनतेला केले आहे. ठाकरे यांच्यानंतर शरद पवार यांनी बंद शांतते पार पाडण्याचे आवाहन केले आहे.
मुलींच्या भवितव्यासाठी जनमत व्यक्त करायला राज्यातील जनता एकत्र येईल आणि भावना व्यक्त करतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. तर यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एका वक्तव्याचा समाचार घेतला आहे. त्यांनी त्यावर नाराजी व्यक्त केली.
मुख्यमंत्र्यांवर व्यक्त केली नाराजी
आम्ही काही बदलापूरला गेलो नव्हतो. कोणत्या पक्षाचे लोक होते. असा प्रकार झाल्यावर ते राजकीय होतं किंवा दुसरी काही टीका करणं योग्य नाहीत. मुख्यमंत्री असं बोलले नसते तर बरं झालं असतं. इथे संवेदना व्यक्त करणारं आहे. इथे कोणी राजकारण आणलं नाही. आमच्या मनातही नव्हते. हा केवळ बालिकांवरील अत्याचाराबाबतच्या तीव्र भावना व्यक्त करणारं आहे. त्याकडे वेगळ्या अँगलने बघू नये, असे त्यांनी कान टोचले.
गृहखात्यानं संवेदनशील व्हावं
एका वृत्तपत्राने अत्याचाराची आकडेवारी जाहीर केली आहे. हे थांबत नाही, वाढत आहे. त्यामुळे समाजाला, कायद्याची यंत्रणा आणि सरकारला जागृत करावं लागेल. मी कुणाला दोष देत नाही. पण शांततेच्या चौकटीत राहून ही काळजी घेता येईल. लोकांनी आपली रिॲक्शन व्यक्त केली. भावना व्यक्त केल्या. त्यांच्यावर गुन्हे दाखल करणं योग्य नाही. राज्य सरकार आणि गृहखात्याने त्याबाबत संवेदनशील व्हावं, असा चिमटा काढत त्यांनी अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला हाणला.
एक दिवस बंद पाळण्याचे आवाहन
कुठे बालिकांवर तर काही ठिकाणी मुलींवर होत होतं. हे चित्र राज्यात दुर्देवाने वाढत आहे. त्याबाबतचा उद्वेग आणि राग लोकांमध्ये आहे. त्यामुळे उद्या एक दिवसाचा बंद करण्यात येणार आहे. तो बंद शांततेत पार पाडू. यातून जनभावना समजून घेण्याची काळजी घ्यावी यासाठी हा बंद आहे. आमच्या पक्षातील सर्व सहकारी सहभागी होतील. राज्यातील प्रत्येक घटकाने सहभागी व्हावे. बंद शांततेत व्हावा, असे आवाहन त्यांनी केले.