मुंबई: कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोलापूर आणि सांगलीतील काही गावांवर दावा केला आहे. त्याविरोधात महाराष्ट्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी तर बोम्मई यांना खडेबोलच सुनावले आहेत. तुम्ही बेळगाव, कारवार आणि निपाणी सोडत असाल तरच पुढची चर्चा होऊ शकते, असं शरद पवार यांनी निक्षून सांगितलं. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील काही गावांवर दावा केला आहे. आम्हीही गेल्या अनेक वर्षापासून कर्नाटकातील काही गावांवर क्लेम करत आहोत. तिथे विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्याही जिंकल्या. बेळगाव,निपाणी, खानापूर, भालकीसह जी महाराष्ट्राची मागणी आहे, त्यात सातत्य आहे, असं शरद पवार म्हणाले.
तिथल्या मुख्यमंत्र्यांना काही गावं हवी आहेत. त्या गावांचं काय म्हणणं हे सांगू शकत नाही. पण बेळगाव, कारवार, निपाणी ही गावं कर्नाटक सोडत असतील तर त्यांना काय देता येईल याची चर्चा होऊ शकते. पण काही न करता कशाची तरी मागणी करणं त्याला आमचा कुणाचा पाठिंबा नाही, असं पवारांनी स्पष्ट केलं.
केंद्रात भाजपचं राज्य आहे. इथे भाजपच्या पाठिंब्याचं राज्य आहे. त्यामुळे असंतोष वाढला आहे. काहीही मागा, काहीही मागण्या करा, कशीही भूमिका घ्या असं सुरू आहे. पण या प्रकरणात देशातील सत्तते बसलेल्या भाजपलाही जबाबदारी टाळता येणार नाही, असं त्यांनी सांगितलं.
गुजरात निवडणुकीच्या प्रचारासाठी राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक रद्द करण्यात आली. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. दुसऱ्या राज्यातील निवडणुकांसाठी आपल्याकडे सुट्ट्या दिल्याचं कधीच घडलं नाही. मात्र गुजरातमधील स्थिती त्यांना चिंताजनक वाटते की काय असं वाटतं. त्यामुळं आपल्याकडे सुट्ट्या दिल्या असाव्यात, असं ते म्हणाले.
यावेळी त्यांनी जितेंद्र आव्हाड प्रकरणावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. सत्तेचा गैरवापर करून जितेंद्र आव्हाड यांना रोखण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, आव्हाड हे विचारांचा लढा सोडणार नाहीत. ते वैचारिक लढाई लढतील, असं त्यांनी स्पष्ट केलं.
आदित्य ठाकरे बिहारला गेले हे चांगलं झालं. ते महाराष्ट्राबाहेर संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ही चांगली बाब आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी एका प्रश्नाचं उत्तर देताना दिली.