महाराष्ट्रात बदल कसा होणार?, शरद पवार यांनी सांगितलं

| Updated on: Jul 30, 2023 | 6:45 PM

शरद पवार म्हणाले, राज्य सरकारशी बोलणं सध्या जरा अडचणीचं आहे. पण, त्यातून आज किंवा उद्या काहीतरी मार्ग निघेल.

महाराष्ट्रात बदल कसा होणार?, शरद पवार यांनी सांगितलं
Follow us on

मुंबई : आम्ही तिघांनी ठरवलं तर महाराष्ट्रात बदल होईल, असं शरद पवार म्हणाले. उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात आणि शरद पवार एकाच कार्यक्रमात उपस्थित होते. या कार्यक्रमात शरद पवार यांनी हे वक्तव्य केलंय. शरद पवार म्हणाले, राज्य सरकारशी बोलणं सध्या जरा अडचणीचं आहे. पण, त्यातून आज किंवा उद्या काहीतरी मार्ग निघेल. मार्ग निघाला की, राज्य सरकारला मदत करणं भाग पडेल. उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात आणि मीसुद्धा आहे. आम्ही तिघांनी ठरवलं तर महाराष्ट्रामध्ये बदल होईल. हे विशेष वेगळं सांगायची गरज नाही.

पुस्तकं अभ्यासपूर्ण लिहिलेली

वाय बी. चव्हाण सेंटरला पुस्तक प्रकाशन सोहळ्यात शरद पवार बोलत होते. सहा ऐतिहासिक ग्रंथांचं प्रकाशन यावेळी करण्यात आलं. वि. का. राजवाडे संशोधन मंडळ ग्रंथ प्रकाशन सोहळ्याचा हा कार्यक्रम होता. शरद पवार म्हणाले, अतिशय चांगला असा हा कार्यक्रम आहे. काही पुस्तक वाचली. काही पुस्तकं चाळली. ही पुस्तकं अभ्यासपूर्ण लिहिली गेलेली आहेत.

इतिहास अधिक समृद्ध केला

शरद पवार यांनी यावेळी एक जुनी आठवण सांगितली. ते म्हणाले, मी राज्याचा प्रमुख होतो. त्यावेळी कर्नाटकता गेलो होतो. तिथं शिवाजी महाराज यांचे बंधू व्यंकोजी यांच्या राज्यात एक प्रशस्त ग्रंथालय होते. त्याठिकाणी मोडी भाषेत शिवाजी महाराज यांच्याबद्दल बरीच पुस्तक लिहिली होती. ते सर्व पाहून राज्यात परत आलो. पाच तज्ज्ञांची एक समिती स्थापन केली. त्यांनी कर्नाटकातील ग्रंथालयात पाठवलं. तिथल्या ग्रंथांचं मराठीत भाषांतर करण्याचं काम दिलं होतं. त्यामुळे शिवाजी महाराज यांचा इतिहास अधिक समृद्ध करण्यास मदत झाली असल्याचंही शरद पवार यांनी म्हंटलं.

गड, किल्ले जपणे आपली जबाबदारी

पुस्तक प्रकाश सोहळ्याला उद्धव ठाकरे उपस्थित होते. उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रात जन्मलेला प्रत्येकजण हा शिवप्रेमी आहे. गड आणि किल्ले हे महाराष्ट्राचं वैभव आहे. गड आणि किल्ले जपण्याची आपली जबाबदारी आहे.