मुंबईः मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयातील शिवसेना पक्ष कार्यालयावर बाळासाहेब शिवसेना अर्थात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून काल ताबा घेण्यात आला आहे. शिंदे गटाने ताबा मिळवण्याच्या आधी हे कार्यालय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे होते. शिंदे गटाने आधी नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये शिवसेनेच्या कार्यालयाचा ताबा घेतला होता. त्यानंतर हे कार्यालय दोन्ही गटांना विभागून देण्यात आली.
तर आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीआधीच शिंदे गटाने आक्रमक होत मुंबई महानगरपालिकेच्या पक्ष कार्यालयावर ताबा घेतल्यामुळे हे राजकारण तापले आहे. त्यामुळे आता शिवसेना भवनाचा मुद्दा उपस्थित केला जात आहे.
शिवसेना भवनबाबत माध्यमांनी खासदार संजय राऊत यांना प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्यांनी सांगितले की, शिंदे गटाचा बाप जरी आला तरी शिवसेना भवनमध्ये घुसू शकत नाही असा थेट इशारा त्यांनी शिंदे गटाला दिला आहे.
संजय राऊत यांच्या या विधानावर शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी मात्र संजय राऊत यांच्यावर जहरी टीका केली आहे.
मुंबई महानगरपालिकेतील ठाकरे गटाच्या कार्यालयावर शिंदे गटाने ताबा मिळवल्यानंतर शिंदे आणि ठाकरे गटातील राजकारण प्रचंड तापले आहे. त्यामुळे आता शिवसेना भवनचा मुद्दाही पुढं येऊ लागला आहे.
शिवसेना भवनच्या मुद्यावरूनच खासदार संजय राऊत यांना छेडल्यानंतर त्यांनी थेट शिंदे गटाचा बाप काढत म्हणाले की, शिंदे गटाचा बाप जरी आला तरी शिवसेना भवनमध्ये घुसू शकत नाही. त्याला खासदार प्रतापराव जाधव यांनी प्रत्युत्तर देत त्यांची अक्कल काढली आहे.
शिवसेना कार्यालयांचा ताबा शिंदे गट साहजिकच घेणार असा दावा आता खासदार प्रतापराव जाधव यांनी केला आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, महानगरपालिका असो, विधानसभा असो किंवा लोकसभा असो या ठिकाणी मिळणारी पक्ष कार्यालयं असतात ती त्या त्या पक्षातील सदस्यसंख्येवरून त्या त्या पक्षांना ही कार्यालयं मिळत असतात.
त्यामुळे मुंबईतील शिवसेना कार्यालया ताबा मिळवणे ही गोष्ट कायदेशीररित्या बरोबर आहे. त्यामुळे त्यांची संख्या आता कमी झाल्या असल्यामुळे आता पक्ष कार्यालय घेण्यात आल्याच प्रतापराव जाधन यांनी सांगितले.
भविष्यातही ठाकरे गटाची सदस्य संख्या कमी होणार असून ही पक्ष कार्यालयं त्यांना सोडावीच लागतील असंही त्यांनी यावेळी सांगितले.