मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे सरकार कोसळणार असल्याचा दावा केला आहे. राज्यात 105 आमदार असलेला फडणवीस गट आणि 40 आमदार असलेला शिंदे गट यांच्या प्रॉक्सी वॉर (छुपे युद्ध) सुरू आहे. हे सरकार कोसळेपर्यंत प्रॉक्सीवार सुरू राहील. हे सरकार पुढच्या दोन महिन्यात सत्तेवर राहणार नाही. हे सरकार अंतर्विरोधाने पडणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने तीन महिन्याची मुदत दिली आहे. त्या आधारे दोन महिन्यात हे सरकार जाईल, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी हा सर्वात मोठा दावा केला आहे.
शिंदे गटाने सरकारी जाहिरातीतून बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा फोटो वगळला आहे. जाहिरातीत चित्र स्पष्ट असलं तरी सर्व काही अलबेल नाही. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल स्पष्ट आहे. विधानसभा अध्यक्षांनी काहीही म्हटलं तरी त्यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशनानुसारच निर्णय द्यावा लागेल. हे सरकार अपात्र ठरेल आणि हे सरकार दोन महिन्यात पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळेल, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
मिंधे गटाचे मंत्री हे वरवरचा आव आणत आहेत. चेहऱ्यावर हास्य आणत आहेत. हे उसनं आवसान आहे. भविष्यात काय होईल त्यांना माहीत आहे. मुख्यमंत्री गुलमर्गमध्ये होते. हॉटेल खैबरमध्ये. त्यांना कोण भेटलं कोणते अधिकारी होते काय चर्चा झाल्या. भविष्यात मी उघड करेल, असा इशारा राऊत यांनी दिला.
बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा जाहिरातीत साधा उल्लेख नाही. बाळासाहेबांचा फोटो नाही. बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे आमची शिवसेना म्हणता आणि बाळासाहेबांचा फोटो नाही? काल भाजपने बांबू घातल्यामुळे, विशेषत: फडणवीस यांनी बांबू घातल्याने नवीन जाहिरात झळकलेली दिसते. पण पडद्यामागे काय घडलं हे मला माहीत आहे. जो बुंद से गयी वो हौदसे नही आती.
काल बेअब्रू झाली. त्यांच्या अंतरंगात काय हे काल स्पष्ट झालं. त्यांचे बाळासाहेब ठाकरे नाहीत, आनंद दिघेही नाही. फडणवीसही नाहीत. काल फडणवीस यांनी बांबू दिल्याने जाहिरातीत चित्र बदललं, असं ते म्हणाले. हितचिंतक अशी जाहिरात देत नाही. शत्रू देतो. हितचिंतक जपून जाहिरात देतो. बाळासाहेब ठाकरे यांना विसरले असा हितचिंतक तुमच्याकडे आहेच क? जरा डोकं ठिकाण्यावर ठेवून बोला, असं राऊत यांनी सुनावलं.