मुंबई : 25 सप्टेंबर 2023 | राज्यात सत्ताबदल होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या काही आमदारांना मंत्रिपदाचे वेध लागले होते. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. त्यांच्यासोबत 20 आमदारांनी मंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर सातत्याने मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची चर्चा होत होती. मात्र, अजित पवार यांच्यासह आठ मंत्र्यांनी शपथ घेतली आणि या मंत्र्याची उरलीसुरली आशा संपुष्टात आली. मात्र, यातील एक आमदार अजूनही मंत्रीपदाची आस लावून बसला आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले संजय शिरसाट, चिमणराव पाटील, योगेश कदम, भरत गोगावले, बच्चू कडू यांची नावे मंत्रिपदाच्या रेसमध्ये होती. आमदार बच्चू कडू यांना दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष करून मुख्य्म्नात्री शिंदे यांनी त्यांचा पत्ता कट केला. तर, संजय शिरसाट, भरत गोगावले यांची नाराजीही दुर करण्यात त्यांनी यश मिळवले.
अजित पवार यांच्यासह आठ मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यावेळी आमदार भरत गोगावले यांनी काहींना पूर्ण भाकरी मिळणार होती. त्यांना अर्धी भाकरी मिळाली. ज्यांना अर्धी भाकरी मिळणार होती त्यांना पाव भाकरी मिळेल असे म्हणत नाराजी व्यक्त केली होती. याच भरत गोगावले यांनी आता मंत्रीपदावरून पुन्हा एक मोठे विधान केलंय.
शिंदे गटाचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन गणरायाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ठाकरे गटाने सुनावण्या एकत्रित करण्याची मागणी करो वा ना करो आमचे वकील बाजू मांडत आहेत असे सांगितले.
आम्हाला काळजी करण्याचे कारण नाही. आम्ही मिरीटवर आहोत. सुनावणी कधी पूर्ण होईल याबाबत काही सांगू शकत नाही आता दोघांचे वकील आपल्या बाजू मांडतील. सुनावणी पुढे न्या असे काही आम्ही अध्यक्षांना सांगू शकणार नाही. अध्यक्ष नियमाप्रमाणे निकाल देतील. आम्ही मेरिटवर असल्यामुळे आम्हाला काळजी करण्याचे कारण नाही. काळजी त्यांना करायची आहे असा टोला लगावला.
ठाकरे गटाने आजपर्यंत जे भविष्य वर्तवलं ते ते सर्व त्यांच्याविरोधात गेले. निवडणुकीनंतर काय घडामोडी घडतील हे आताच सांगू शकत नाही. आम्ही तिघे आता सोबत चाललो आहोत. असे सांगतानाच मुख्यमंत्र्यांच्या बाप्पाकडे राज्याच्या विकासाच्या दृष्टीने साकडे घातलं. बाप्पाला कळतंय भरत शेठला मंत्री करण्याविषयी त्यामुळे ते तर लवकरच होईल. वेळ आली की भरत गोगावले मंत्री होईल, असे त्यांनी सांगितले.