बुलढाणाः राज्यात सध्या राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. एकीकडे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. तर दुसरीकडे शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या चिन्हावरून चाललेल्या न्यायालयीन लढ्यावरूनही एकमेकांवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. त्यातच निवडणुकांच्या पोस्टरवरुनही जोरदार खडाजंगी चालू असल्याचे दिसून येत आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतून बंडखोरी करून बाहेर पडलेल्या आमदारांवर गद्दारीचा शिक्का ठाकरे गटाने मारला आहे. त्यामुळे त्यांच्यावर वारंवार बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वापरला जात असल्याने त्यांच्यावर प्रचंड टीका केली जात आहे.
त्यामुळे या वादावर बोलताना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी ठाकरे गटाला सुनावताना स्पष्टच सांगितले आहे की, बाळासाहेब ठाकरे हे काही कोणाची खासगी मालमत्ता नाही ते विश्व वंदनीय असून महापुरुष असल्याचे सांगत बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आमचापण हक्क आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले.
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतून बंडखोरी बाहेर पडलेल्या आणि ठाकरे गटाने त्यांच्यावर गद्दारीचा शिक्का मारलेला असतानाच शिंदे गटाकडून मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेवर आपलाच हक्क सांगितला जात आहे.
शिंदे गटाकडून कोणत्याही कार्यक्रमामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचाच फोटो वापरला जातो. त्यामुळे ठाकरे गटाकडून आणि उद्धव ठाकरे यांच्याकडूनही हल्ली लोकं दुसऱ्यांचे वडिलही चोरतात अशी टीका करतात.
त्या टीकेला प्रत्युत्तर देताना शिंदे गटाचे नेते संजय गायकवाड म्हणतात की, देशाचा महापुरुष हा कोण्या एकट्याच नसतो. त्यामुळे कोणी कितीही ओरडले तरी बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आमचाच हक्क आहे.
कारण त्यांनी सांगितलेल्या हिंदुत्वासाठीच आम्ही त्यांच्या विचाराने घालून दिलेल्या वाटेवरून चालत आहोत असंही त्यांनी यावेळी स्पष्ट सांगितले.
त्यामुळे आमच्या कायदेशीर दृष्ट्या कोणीही काहीही करू शकत नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले.
उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी हल्ली लोकं दुसऱ्यांचे वडिलही चोरतात असा टोला त्यांनी शिंदे गटाला लगावला होता. त्या टीकेला उत्तर देताना संजय गायकवाड यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
आपण आपल्या वडिलांसाठी काय केले, आणि आमच्यासारख्य लोकांनी किती रक्त सांडले हे त्यांनी एकदा पाहावे. शिंदे गटातील हे मावळे सोबत होते, म्हणून बाळासाहेबांचे विचार देशभर पोहचले आहेत या शब्दात त्यांनी त्यांना सुनावले आहे.