मुंबई : 27 सप्टेंबर 2023 | लोकसभेत महिला आरक्षणाच्या विधेयकाला पाठींबा देण्यासाठी शिवसेनेचे लोकसभेतील मुख्य प्रतोद राहुल शेवाळे यांनी व्हीप बजावला होता. मात्र, तो व्हीप उद्धव ठाकरे यांच्या गटातील चार खासदारांनी नाकारला. या विधेयाला पाठींबा देण्यासाठी ओमराजे निंबाळकर, बंडू जाधव, राजन विचारे आणि विनायक राऊत हे चार खासदार अनुपस्थित होते. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत राहुल शेवाळे यांनी दिले आहेत. यावर बोलतान शिवसेनेचे (शिंदे गट) मंत्री शंभूराज देसाई यांनी ज्यांनी पक्षाचा व्हीप पाळलेला नाही त्यांच्यावर नक्कीच पक्षाकडून कारवाई केली जाईल, असा इशारा दिलाय.
महिला आरक्षणासंदर्भात अत्यंत महत्वाचं असं हे विधेयक लोकसभेत आणण्यात आलं होतं. या विधेयकाला हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचीदेखील मंजुरी होती. पण, 4 खासदार यावेळी अनुपस्थित होते. त्यामुळे उबाठा गटाचा खरा चेहरा आता लोकांसमोर आला अशी टीका मंत्री देसाई यांनी केली.
अब्दुल सत्तार यांचे पीए किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून कोणत्याही सामाजिक कार्यकर्त्याला मारहाण झाली असेल तर त्या संदर्भाची शोध मोहीम पोलिसांकडून केली जाईल. पोलिसांनी सध्या प्राथमिक गुन्हा दाखल केला आहे. परंतु, त्या गुन्ह्याची चौकशी होणं बाकी आहे. अनेक गुन्ह्यांचे निकाल हे नंतर बदलत असतात, असे त्यांनी सांगितले.
विजय वडेट्टीवार हे आत्ताच विरोधी पक्ष नेते झाले आहेत. त्यांना त्यांच्या पक्षातील लोकांना खुश करण्यासाठी मुख्यमंत्री यांच्यावर टीका करावी लागते. मुख्यमंत्री यांच्या भेटीसाठी हजारो नागरिक रोज मंत्रालयातील त्यांच्या दालनात येत असतात. त्या ठिकाणी गर्दी सर्वांनी पहावी. सर्वांना न्याय देण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत असतात, असा टोला त्यांनी लगावला.
आम्ही काही कागदपत्रे दिली. काही त्यांनी दिली. त्यांची कागदपत्रे आमच्याकडे आमची कागदपत्रे त्यांच्याकडे दिली. त्याचा अभ्यास केला जातो. ज्यांनी अर्ज दाखल केला आहे, त्यांना असे वाटते की आज अर्ज दाखल केला. दुसऱ्या दिवशी सुनावणी घ्या आणि तिसऱ्या दिवशी अपात्र करा, असे कधी होत नाही, अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरे गटावर केली.
विधानसभा अध्यक्ष नियमाप्रमाणे सर्व करताहेत यावर आमचा विश्वास आहे. अर्ज दाखल केल्यावर म्हणतात उद्या घरी जाणार अशी भडक वक्तव्य करताहेत. पण, ज्यांना नियम माहित नाही. घटनेतील तरतुदी माहित नाही. ज्यांना ही प्रोसेस समजत नाही त्यांच्यावर काय बोलणार? त्यांना बोलून काहीच फायदा नाही. अध्यक्षांवर त्यांना विश्वास नाही असंच म्हणता येईल, असा टोला त्यांनी ठाकरे गटाच्या आमदारांना लगावला.