अंबरनाथः एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिल्यानंतर अंबरनाथमध्ये युवा सेनेकडून बॅनर्स लावण्यात आले आहेत. ज्यामध्ये “काँग्रेस राष्ट्रवादीच्या पायी गहाण असलेला आपला धनुष्यबाण एकनाथाने सोडवला”, असं बाळासाहेब ठाकरे हे आनंद दिघे यांना उद्देशून म्हणत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. या बॅनर्समुळे शिवसेना आणि ठाकरे गट यांच्यामध्ये पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ज्या दिवशी न्यायालयाकडून हा निर्णय देण्यात आला आहे. त्या दिवसांपासून दोन्ही गटातील वाद टोकाला गेल्याचे दिसून येत आहे.
अंबरनाथच्या वडवली परिसरातील रोटरी क्लब चौकात हे बॅनर लावण्यात आले आहेत.
युवा सेनेच्या राज्य कार्यकारणी सदस्य स्नेहल कांबळे यांनी हे बॅनर्स लावले असून शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळाल्यानंतर सर्वसामान्य कार्यकर्त्याला आनंद झाल्याचं त्यांनी म्हटले आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पायी गहाण ठेवलेला आपला धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांनी सोडवला असून याचा कार्यकर्त्यांना आनंद असल्याचेही आपण हा बॅनर लावल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
या लावलेल्या बॅनरमुळे शिंदे गट आणि ठाकरे गटातील हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. कारण न्यायालयाने चिन्ह आणि पक्ष या दोन्ही गोष्टींचा निर्णय शिंदे गटाच्या बाजूने दिला आहे. तेव्हापासून दोन्ही गटातील नेत्यांकडून टोकाची टीका केली जात आहे.
ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनीही शिंदे गटावर न्यायालयाच्या निर्णयापासून जोरदार हल्लाबोल चालू केला आहे. तर संजय राऊत यांच्यावरही शिंदे गटातील आणि भाजपमधील नेत्यांनीही सडकून टीका केली जात आहे.
न्यायालयाच्या निर्णयानंतर खासदार संजय राऊत यांनी न्यायालयं ही सत्ताधाऱ्यांच्या खिशात असल्याची टीकाही त्यांनी केली होती. त्यावर शंभूराज देसाई, आशिष शेलार, नरेश म्हस्के यांनीही संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता.