मुंबईः शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणाच्या निर्णयामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले असतानाच शिंदे गटाने मात्र पुन्हा एकदा ठाकरे गटावर पलटवार केला आहे. शिवसेनेचं चिन्ह आणि पक्ष शिंदे गटाला मिळाल्यानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे आणि पक्षावर सडकून टीका केली आहे. पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडून भावनात्मक वातावरण तयार केले जात असल्याची टीका त्यांनी केला आहे.
नरेश म्हस्के यांनी पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाकडे आल्याने आता ठाकरे गटाची पायाखालची वाळू सरकली आहे. त्याचमुळे उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना केवळ भावनात्मक वातावरण तयार करत आहेत.
मात्र निशाणी हा चोरायचा विषय नसतो कारण शिंदे गटाकडे आता सर्वात जास्त खासदार आणि आमदार हे आमच्या बाजूने असल्याचे सांगत त्यांनी ठाकरे गटाला पुन्हा छेडण्याचा विचार केला आहे.
शिंदे गटाला पक्ष आणि चिन्हे मिळाल्याची महत्वाची कारणं आहेत. कारण ज्या दिवसांपासून महाविकास आघाडचे सरकार अस्तित्वात आले होते.
तेव्हापासून ठाकरे गटाने शिवसेनेला राष्ट्रवादीच्या ताटाखालचं मांजर बनवले होते असा घणाघातही त्यांनी यावेळी केला. आतापर्यंत तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे विचार विसरून तुम्ही बुरखा घालून राष्ट्रवादीच्या मागे पुढे फिरत होता.
त्या कारणामुळे शिंदे गटाच्या मागे लोकं उभा राहिले असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. ठाकरे गटावर टीका करताना त्यांनी न्यायालयीन निर्णयावर टीका करणाऱ्या ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला आहे.
ज्यावेळी दसरा मेळाव्यावेळी त्यांच्या बाजूने निर्णया लागला तेव्हा यांचा न्यायदेवतेवर विश्वास होता. परंतु आता न्यायदेवतेच्या विरोधात हे बोलत आहेत असा खोचक टोलाही त्यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांना लगावला आहे.
निवडणूक आणि न्यायालयीन लढाईनंतर शिंदे गटाने ज्या प्रमाणे ठाकरे गटावर निशाणा साधला आहे, त्याच प्रमाणे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
पक्ष आणि चिन्हाच्या निर्णयानंतर कुत्र्याचे उदाहरण संजय राऊत यांनी दिले होते. त्यावरूनही आता राजकारण तापले आहे. उद्धव ठाकरे शिवसेनेचे मालक समजत होते का असा सवाल नरेश म्हस्के यांनी केला आहे.
आणि आतापर्यंतचे कार्यकर्ते काम करत होते ते कुत्रे होते का असं संजय राऊत यांना म्हणायचे आहे का असा सवाल त्यांनी संजय राऊत यांना केला आहे.
कालच्या निर्णयानंतर संजय राऊत शिवसैनिकांना कुत्रा बोलत आहेत. मात्र खासदार संजय राऊत यांच्या वाक्यातून उद्धव ठाकरे कशाप्रकारे सूचनांवर चालत होते हे सत्य महाराष्ट्राला कळले आहे असंही त्यांनी यावेळी म्हटले.
संजय राऊत यांच्याकडून शिंदे गटावर आणि भाजपवर टीका केली जात असली तरी संजय राऊत हे बोरू बहाद्दर आहेत. सामनाच्या ऑफिसमधून फक्त लिहिण्याचे काम ते करत असल्याची टीका त्यांनी त्यांच्यावर केली आहे.
खासदार संजय राऊत हे आमच्या आमदार आणइ खासदारांच्या मतांवरून तुम्ही खासदार बनलेले आहेत. त्यामुळे खरी शिवसेना ही आम्हीच वाढवली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
खासदार संजय राऊत तुमच्यासमोर खासदारकीचे हाडूक टाकले आहे आणि तुम्ही मान हलवत आहात अशी जहरी टीकाही त्यांनीत संजय राऊत यांच्यावर केली आहे.
या पक्ष आणि चिन्हाच्या निर्णयानंतर आता शिंदे गट शिवसेना भवनवरही दावा करू शकते असा संशय व्यक्त केला जात आहे. त्यावर नरेश म्हस्के यांनी सांगितले की, आम्हाला कोणाच्याही शिवसेना भवनाची गरज नाही , कारण आम्ही आमचा शिवसेना भवन उभा करू असा शब्दात टीका करणाऱ्यांना त्यांनी उत्तर दिले आहे.