निवृत्ती बाबर, प्रतिनिधी, मुंबई : मातोश्रीवरील प्रवेशादरम्यान उद्धव ठाकरे यांनी मोठं विधान केलं. शिशीर धारकर यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, तुम्ही लढवय्यांच्या सेनेत आलात. मात्र, आव आणणारे काही जण डोळे वटारल्यावर पळून गेले आहेत. उद्धव ठाकरे यांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षपणे ही टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले, सगळ्याचं शिवसेनेत स्वागत आहे. तुम्ही लढवय्यांच्या सेनेत प्रवेश केला आहे. काहीजण बघीतले आव मोठा आणतात. डोळे वटारले की पळून गेले. पण, तुम्ही पळपुटे नाहीत, याचा मला अभिमान आहे. शेवटी अन्यायावर वार करणं आपली ख्याती आहे.
अन्याय सहन करायचा नाही. तसं पाहायचं तर तुम्हाला सोपा मार्ग होता. वाशिंग मशीनमध्ये जाऊ शकला असता. पण कर नाही त्याला डर कशाला असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.
वाशिंग मशीनमध्ये जायच्या आधी लढवय्यांच्या सेनेत आलात. लढवय्ये शिवसैनिक सोबत आहेत. संपूर्ण चांदा ते बांदा आपल्याला बदल करायचा आहे. सत्तेपुढे शहाणपण टिकतं नाही म्हणतात. पण आपल्याला शहाणपणाची सत्ता आपल्याला आणायची आहे. तुम्ही मूर्ख बनवण्याची उद्योग सुरु केला आहे. तो जास्त काळ चालणार नाही. जास्त बोलत नाही. तुमच्याकडे येऊन पेणमध्ये जाहीर सभेत बोलेन, असंही उद्धव ठाकरे यांनी सुनावलं. भगवा हातातून सुटू देऊ नका. तुम्ही तारीख ठरवा पेणला सभा घेऊ असंही ठाकरे यांनी म्हंटलं.
यावेळी बोलताना अनंत गिते म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिशिर धारकर यांचा आज पक्षप्रवेश होत आहे. यांच्यासोबत हजारो कार्यकर्ते पक्ष प्रवेश करत आहेत. तुम्ही जो उत्साह दाखवला आहे हा प्रवेश पेणच्या राजकारणाला कलाटणी देणारा पक्ष प्रवेश असेल. मी उद्धव ठाकरे यांना शब्द देतो की पुढचा पेणचा आमदार आपलाच असेल, असा विश्वास गिते यांनी व्यक्त केला.