मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे नुकतंच विधान परिषदेच्या तीन शिक्षक आणि दोन पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. विशेष म्हणजे नाशिकमध्ये या निवडणुकीदरम्यान ज्या घडामोडी घडल्या ते पाहता महाराष्ट्र काँग्रेसमध्ये (Congress) दोन गट पडले की काय? अशी परिस्थिती निर्माण झालीय. विशेष म्हणजे काही नेते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्याविरोधात बोलत आहेत. हे नेते काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्याबाजूने आहेत. दुसरीकडे बाळासाहेब थोरातांनीदेखील काँग्रेस हायकमांडला पत्र पाठवून नाना पटोलेंची तक्रार केलीय. या सगळ्या घडामोडींनंतर एक महत्त्वाची बातमी समोर आलीय. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाना पटोले यांना फोन केल्याची माहिती सूत्रांकडून मिळालीय.
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यात नुकतंच फोनवर संभाषण झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
उद्धव ठाकरे यांनी नाना पटोले यांना फोन करण्यामागील कारण म्हणजे पुण्यात विधानसभेच्या दोन जागांसाठी होणारी पोटनिवडणूक.
विशेष म्हणजे पुण्यातील कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड विधानसभा जागांच्या पोटनिवडणुकीवरुन महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच तापलं आहे. यात पोटनिवडणुकीबद्दल उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांच्या चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
कसबा आणि चिंचवड मतदारसंघात महाविकास आघाडी म्हणून एकत्रित काम करण्याबद्दलची चर्चा दोन्ही नेत्यांमध्ये झाल्याची माहिती समोर आलीय.
पोटनिवडणुकीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि नेते कामाला लागतील, असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी नाना पटोले यांना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
काँग्रेसने महाविकास आघाडीच्या वतीने कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केलाय. विशेष म्हणजे त्याआधी गेल्या दोन दिवसांपासून महाविकास आघाडीचा उमेदवार कोणाला जाहीर करावं, याबाबतचं चर्चासत्र सुरु होतं. या दरम्यान काल उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांच्यात फोनवर चर्चा झाल्याची माहिती समोर आलीय.
“कसबा पोटनिवडणूक लागलेली आहे. या निवडणुकीत आपण महाविकास आघाडी म्हणून सर्व एकत्रित काम करु. ठाकरे गटाचे सर्व कार्यकर्ते त्यासाठी काम करतील”, असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिलंय.
या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाना पटोले सातत्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांशी संपर्क साधत आहेत. भाजपच्या विरोधात एकत्र लढा देण्याचा निर्णय महाविकास आघाडीतील पक्षांनी निर्धार केला आहे. त्यामुळे तीनही महत्त्वाचे पक्ष एकत्र येऊन निवडणुकीला सामोरे जात आहेत.
दरम्यान, काँग्रेसकडून कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर केलीय. रवींद्र यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यावेळी काँग्रेसकडून शक्तीप्रदर्शन करण्यात आलं.