मुंबई | 11 सप्टेंबर 2023 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आंनदराव अडसूळ यांनी एसटी कर्मचाऱ्यांचे नेते आणि निलंबित वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर निशाणा साधला आहे. “गुणरत्न सदावर्ते यांची एसटी बँकेत गेल्या अनेक दिवसांपासून मनमानी सुरू आहे”, अशी टीका आनंदराव अडसूळ यांनी केलीय. “बँक बुडायला आलीय. त्यांनी एका 21 वर्षीय तरुणाला एमडी म्हणून घेतलंय”, असं आनंदराव अडसूळ म्हणाले आहेत. त्यांच्या टीकेवर सदावर्ते यांनी “अडसूळ, वेड्या तुला काय माहीत, माझ्यामागे कधी ईडी लागली नाही”, असं म्हणत निशाणा साधला आहे.
“गुणरत्न सदावर्ते हे एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष शेखर चन्ने यांनाही ते विश्वासात घेत नाहीत. सहकार कायदा पायदळी तुडवला जातोय”, असा आरोप अडसूळ यांनी केला. “गुणरत्न सदावर्ते हे बँकींग सेक्टरला कलंक आहे. सहकारी बँका बुडवायला निघाले आहेत. ते कुणाचंही ऐकत नाहीत. कर्मचाऱ्यांवर दमदाटी करतात”, असाही आरोप आनंदराव अडसूळ यांनी केला.
“आमचा थेट आरोप आहे की, त्यांनी जे 23 ठराव मांडले आहेत ते रद्द करावे. बँकेचे अधिकार तसेच राहावेत. सदावर्ते आणि त्यांची पत्नी आततायीपणा करत आहेत. सात दिवसांपासून हे सगळं सुरू असताना सरकार का गप्प? हा देखील सवाल आहे. त्यामुळे या व्यक्तीवर कारवाई होणं गरजंचे आहे. चौकशी होणं गरजेचं आहे”, अशी मागणी आनंदराव अडसूळ यांनी केली.
“आम्ही याबाबात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रव्यवहार केलाय. आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्हाला आमचं सरकार असतानाही या विरोधात रस्त्यावर उतरावं लागेल”, असा मोठा इशारा आनंदराव अडसूळ यांनी यावेळी दिला.
“संचालकांचा एक रुपया खर्च होणार नाही. आनंदराव अडसूळ यांना दोन टर्म लोकांनी घरात बसवलं. ते बँकेला बदनाम करत आहेत. बँकेचे प्रशासन अडसुळांविरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार”, अशी प्रतिक्रिया गुणरत्न सदावर्ते यांनी दिली. “अडसूळ लबाड बोलू नकोस. अडसूळ वेड्या तुला काय माहीत, माझ्यामागे कधी ईडी लागली नाही”, असा टोला गुणरत्न सदावर्ते यांनी लगावला.
“7.50 टक्के इंटरेस्ट रेटला पोट दुखलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवाराचं सरकार होतं तेव्हा तामिळनाडूला 6.40 टक्क्याने लोन दिलं. अडसूळ लिंबूटिंबू मुलासारखं बोलतात. 24 कोटींचं टेंडर पास होणार नाही, ही पोटदुखी. रक्तपिपासू वृत्ती, बोगसगिरी बँकेत होणार नाही”, असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले.
“बँकेत आरक्षण दिलं जाईल. बँकेला कोणताच धोका नाही. बँकेचे फॉरेन्सिक ऑडीत करण्याचा निर्णय घेतला ही पोटदुखी होतेय. अखंड भारताचं तैलचित्र लावलं म्हणून अडसूळ यांची पोटदुखी झालीय”, अशी टीका सदावर्ते यांनी केली.