महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात अनेक मोठ्या घडामोडी घडण्याचे संकेत आहेत. त्यामागे कारण देखील तसंच आहे. कारण लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर लगेच सहा महिन्यांनी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. या विधानसभा निवडणुकीवेळी महाराष्ट्रातील राजकीय वातावरण वेगळं असणार आहे. कारण महाराष्ट्रातील दोन मोठ्या पक्षांमध्ये फूट पडली आहे. त्यामुळे दोन पक्षांचे चार पक्ष झाले आहेत. याशिवाय भाजप आणि काँग्रेस ही दोन मोठी पक्ष आहेत. लोकसभा निवडणुकीवेळी महायुतीचं जागावाटप हे विद्यमान खासदारांच्या संख्येवरुन झालं. तर काही ठिकाणी कोणता उमेदवार जिंकून येऊ शकतो याची खात्री बघून जागावाटप झालं. या जागावाटपात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कमी जागा मिळाल्या. पण आगामी विधानसभा निवडणुकीत आमच्या पक्षाला 80 ते 90 जागा मिळतील. भाजपने महायुतीत सहभागी होताना याबाबतचा शब्द दिला होता, असा दावा छगन भुजबळ यांनी केलाय. त्यांच्या याच वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी आक्षेप घेतला आहे.
“छगन भुजबळ यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याच्याशी आम्ही सहमत नाही. छगन भुजबळ यांच्या मनात नेमकं काय आहे, त्याचा खुलासा त्यांनी लवकर केला तर बरं राहील. कारण अशीच मागणीचा प्रत्येक पक्ष करायला लागला तर मग कुठेतरी समन्वय कमी पडेल आणि विरोधकांच्या हाती आयतं कोलित लागेल हे त्यांनी लक्षात ठेवावं. त्यामुळे महायुती धर्मामध्ये कुठलाही खल पडेल असं वक्तव्य त्यांनी करता कामा नये”, असा शब्दांत संजय शिरसाट यांनी भुजबळांना सुनावलं आहे.
“लोकसभा निवडणुका संपलेल्या आहेत आणि आता विधानसभेच्या तयारीला सगळे पक्ष लागले जरी असले तरी देखील प्रत्येक पक्ष आपापल्या परीने जास्त ताकदीने या निवडणुका लढण्याचा प्रयत्न करतोय. त्यामध्ये गैर असण्याचे काही कारण नाही. पण आमची समन्वय समिती आहे. महायुती आहे आणि या महायुतीमध्ये एकत्र बैठक करून सगळे निर्णय घेतले जातील. त्यामुळे नेत्यांनी उघड-उघड प्रसार माध्यमांसमोर कुठलीही वक्तव्य करू नयेत, असं आम्हाला वाटतंय”, असं संजय शिरसाट म्हणाले.
“विधान परिषदेच्या चार जागांबद्दलचा निर्णय मुख्यमंत्री घेतील. अनेक गोष्टी मात्र निश्चित आहेत की चार जागा शिवसेना काही लढवणार नाही आणि ज्या योग्य जागा आमच्या वाट्याला असतील त्या जागा आम्ही लढवू. पण अंतिम निर्णय हा मुख्यमंत्रीच घेतील”, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली.
यावेळी संजय शिरसाट यांनी पुण्याच्या हिट अँड रन प्रकरणावरही प्रतिक्रिया दिली. “मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका यापूर्वी जाहीर केलेली आहे आणि त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही. विरोधकांकडून ज्या पद्धतीच्या उड्या सध्या मारल्या जात आहेत ते देखील अत्यंत चुकीचं आहे. चुकीच्या गोष्टीचं राजकारण यांच्याकडून सुरू आहे. सुषमा अंधारे काय जातात, लेटर काय जारी करतात, झालं त्याबद्दल आधीच खुलासा केलेला आहे ना?”, असं संजय शिरसाट म्हणाले.
“दोन डॉक्टरांना अटक झाली. गुन्हे दाखल झाले. ही चांगली बाब आहे. जर अशा पद्धतीने आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलले जात असतील तर हे किती चुकीचे आहे, म्हणजे तुम्ही पोलिसांवरती किती दबाव टाकताय, डॉक्टरांवर दबाव टाकताय. पैशाचा माज आलाय. यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, या भूमिकेचे आम्ही आहोत आणि आरोपीला कठोर शिक्षा दिल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाहीत”, अशी भूमिका संजय शिरसाट यांनी मांडली.