मुंबई : राष्ट्रीवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राजीनामा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. अजित पवार आणि सुप्रिया सुळे वगळता पवार राजीनामा देणार असल्याचं कुणालाही माहीत नव्हतं असं सांगितलं जात आहे. मात्र, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या राजीनाम्याची आपल्याला कुणकुण होती, असा दावा केला आहे. शरद पवार यांच्या मनातील अस्वस्थता जाणवत होती. भाकरी फिरवण्याची वेळ वरून सुरू होते की काय असं वाटतं होतं. त्यांनी मुख्य तव्यावरचीच भाकरी फिरवली. तवाच फिरवला, असं संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना म्हटलं आहे.
शरद पवारांनी राजकारण संन्यास घेतलेला नाही. एका विशिष्ट परिस्थिती किंवा दुसऱ्यांसाठी जागा रिकामी केली पाहिजे म्हणून त्यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. दुसऱ्यांसाठी जागा रिकामी करावी असं फार कमी लोकांना वाटतं. पण पवार हे देशाच्या राजकारणात काम करतील. विरोधी पक्षाचे नेतृत्व करत राहतील. भाजप संपत नाही तोपर्यंत ते काम करत राहतील. त्यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. राजकारणाचा संन्यास घेतला नाही, असं संजय राऊत म्हणाले.
शरद पवार हे राजकारणाचे प्राण आणि श्वास आहे. त्यामुळे ते आमच्या बरोबर आणि त्यांच्या पक्षासोबत काम करतील. त्यांच्या पक्षापुरता हा प्रश्न असला तरी ते देशाचे नेते आहेत. शरद पवार यांचं नेतृत्व अढळ आहे. राजकारणातील त्यांचं स्थान कायम आहे. ते राहील. जेव्हा गरज पडेल तेव्हा आम्ही त्यांचं मार्गदर्शन घेऊ. या घडामोडींवर मी उद्धव ठाकरेंसोबत चर्चा केली. राष्ट्रवादीच्या घडामोडीवर चर्चा केली. शिवसेनेत घडामोडी झाल्या तेव्हा इतर पक्षातही चर्चा झाली. अशा चर्चा होत असतात, असं राऊत यांनी सांगितलं.
शरद पवार यांचं पुस्तक पूर्ण वाचलं नाही. ते आत्मचरित्र आहे. त्यात अनेक गोष्टी येतात. व्यक्तीगत गोष्टी येतात. मी कार्यक्रमाला जाणार होतो. पण जाऊ शकलो नाही. पुस्तकात काय आहे हे माहीत नाही. अनेक वर्ष संघर्ष केलेल्या नेत्याची ही कथा आहे. त्यात काही आक्षेपार्ह असेल तर जे जिवंत आहेत. ते उत्तर देतील. पवारांच्या उद्धव ठाकरेंबाबत काही भूमिका आहेत. या ज्या काही घडामोडी आहेत. त्यावर उद्धव ठाकरे बोलणार आहेत. दैनिक सामनातून उद्धव ठाकरे यांची मुलाख प्रसिद्ध होणार आहे. त्यावर ते सडेतोड बोलतील, असं ते म्हणाले.
आम्ही कर्नाटकात प्रचाराला जात असतो. ही आमची परंपरा आहे. तिथल्या मराठी माणसाच्या पाठिशी उभं राहणं हे आमचं कर्तव्य आहे. मुख्यमंत्री म्हणतात ते बेळगावच्या लढ्यात होते आणि तुरुंगवास भोगला. तुम्ही खरोखरच बेळगावच्या तुरुंगात होते तर मग महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रचाराला मुख्यमंत्र्यांनी जावं. माझ्यावर वारंट आहे. बेळगावात गेल्यावर मला कोर्टात जावं लागेल. नंतर प्रचाराला जावे लागेल. मुख्यमंत्र्यांनी सुस्कारे सोडू नये. सीमाभाग आमचाच म्हणून चालणार नाही. संकटकाळी बेळगावातील लोकांचाया पाठी उभं राहा, असं आव्हानच त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या लोकांचा पराभव व्हावा म्हणून देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुंबईतील मराठी लोकांच्या फौजा पाठवल्या आहेत. महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात पैसा गेला आहे. एकीकरण समितीच्या लोकांचा पराभव व्हावा म्हणून. पण आम्ही बेईमानी करणार नाही. आम्ही कर्नाटकात प्रचाराला जात आहोत, असंही ते म्हणाले.