ठाकरे गटावर शोककळा, पोलिंग बूथवर काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा मृत्यू

| Updated on: May 20, 2024 | 8:48 PM

डिलाईड रोड येथील बीडीडी चाळ क्रमांक 20 च्या इथं म्हस्कर उद्यानात ठाकरे गटाचा पुलिंग बूथ होता. इथे मनोहर नलगे हे काम करत होते. पण काम करत असताना ठाकरे गटाचे कार्यकर्ते मनोहर नलगे यांचा मृत्यू झाला.

ठाकरे गटावर शोककळा, पोलिंग बूथवर काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा मृत्यू
ठाकरे गटावर शोककळा, पोलिंग बूथवर काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा मृत्यू
Follow us on

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे राजकीय वातावरण तापलेलं बघायला मिळालं. या निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान आज पार पडलं. सध्या उन्हाळा असल्यामुळे मतदानासाठी गेलेल्या नागरिकांना त्याचा फटका बसला. काही मतदानकेंद्रांवर मतदानासाठी गेलेल्या मतदारांना उन्हामुळे चक्कर आल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. काहींची प्रकृती बिघडली. तर वरळीत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. वरळीतील ठाकरे गटाच्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे. मनोहर नलगे असं कार्यकर्त्यांचं नाव होतं. मनोहर 62 वर्षांचे होते.

डिलाईड रोड येथील बीडीडी चाळ क्रमांक 20 च्या इथं म्हस्कर उद्यानात ठाकरे गटाचा पुलिंग बूथ होता. इथे मनोहर नलगे हे काम करत होते. दरम्यान, तीव्र उन्हामुळे या शिवसैनिकाला त्रास होऊ लागला आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. मनोहर नलगे यांना इतरांनी केईएम रुग्णालयात दाखल केलं असताना डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या घटनेमुळे नलगे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातही शोककळा पसरली आहे.

दरम्यान, राज्यात लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान आज पार पडलं. या टप्प्यात मुंबईतील सहा मतदारसंघांसह ठाणे, कल्याण, पालघर, भिवंडी, नाशिक, दिंडोरी, धुळे या मतदारसंघांचा समावेश होता. मुंबईतील सहाही मतदारसंघांमध्ये नागरिकांनी मतदानाला उत्सफूर्त प्रतिसाद दिला. पण काही मतदान केंद्रांमध्ये निवडणूक प्रतिनिधींकडून मुद्दाम दिरंगाई केला जात असल्याचा आरोप ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोग आणि मोदी सरकारवर निशाणा साधला.