मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (MNS) आता शिवसेनेच्या (Shiv Sena) ठाकरे गटाला मोठा झटका देण्यात आला आहे. ठाकरे गटातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केल्याची बातमी समोर आली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या आठ महिन्यांमध्ये अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह 40 आमदारांचा गट वेगळा झाल्याने शिवसेना पक्ष दोन गटात विभागला गेला. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना पक्षाचं चिन्ह आणि नाव दिलं. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना मोठा दिलासा मिळाला.
दुसरीकडे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना वारंवार धक्क्यावर धक्के बसत आहेत. शिंदे यांनी बंड पुकारल्यापासून ठाकरेंना झटके बसत आहेत. शिंदे यांनी आधी काही आमदार फोडले. त्यानंतर त्यामध्ये आणखी आमदारांची भर झाली. नंतर आणखी काही खासदारांची भर पडली. त्यानंतर जिल्ह्यानुसार शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. एकनाथ शिंदे यांच्याकडून हे झटके मिळत असतानाच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून ठाकरे गटाला मोठा झटका देण्यात आला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज शिवसेनेच्या ठाकरे गटाला मुंबईत मोठं खिंडार पाडलं आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकीय पक्ष आपआपल्या पक्ष विस्ताराच्या कामाला लागलं आहे. या पक्ष विस्ताराच्या कामात मनसेने आज मोठी कामगिरी केलीय. मनसेने सध्या मुंबईत पक्ष बांधणीवर जोर दिलाय.
मनसेत आज मुंबईच्या दिंडोशी विधानसभा भागातील शिवसेना ठाकरे गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. मनसे दिंडोशी विभाग अध्यक्ष भास्कर परब यांच्या मार्गदर्शनाखाली हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. विशेष म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. शिवसेना ठाकरे गटाचे 3 उपशाखा प्रमुख आणि युवासेना पदाधिकाऱ्यांनी आज मनसेत प्रवेश केला. राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.