मुंबई : पंतप्रधान मोदींनी मुंबईतून महापालिकेच्या निवडणुकीचं रणशिंगच फुंकलं. मोदींनी मुंबईकरांना महापालिका निवडणुकीत आशीर्वाद देण्याचं आवाहन केलं. तर आम्ही मोदींचेच माणसं असं म्हणणाऱ्या शिंदेंवर ठाकरे गटानं टीकास्त्र सोडलंय. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या राऊतांनी, जम्मू मधून जळजळीत वार केलेत.
मुंबईतून पंतप्रधान मोदींनी एकप्रकारे बीएमसी निवडणुकीच्या प्रचाराचं रणशिंग फुंकलं. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या एका वक्तव्यानं, ठाकरे गटानं जोरदार टीका केलीय. नुकतंच गुंतवणुकीचे करार करुन, शिंदे दावोसवरुन परतले. तिथला अनुभव सांगताना, मुख्यमंत्र्यांनी आम्ही मोदींचेच माणसं आहोत आणि त्यांसोबतच आहोत असं जाहीरपणे सांगितलं. पण असं सांगण्यात कोणती मर्दुमकी, अशी टीका संजय राऊतांनी केलीय.
राऊतांच्या याच जळजळीत टीकेनंतर, शिंदे गटानं पुन्हा संजय राऊतांना घेरलंय. फडणवीसांबरोबरच, स्वत: पंतप्रधान मोदींनीही पुढचं लक्ष्य मुंबई महापालिकाच आहे दाखवून दिलंय. मोदी आतापर्यंत थेट उद्धव ठाकरेंवर बोलले नाही. पण बीकेसीतल्या मैदानातून, त्यांनी मुंबईतल्या रस्त्यांची स्थिती आणि दुसरीकडे महापालिकेच्या बँकेतल्या फिक्स डिपॉझिटवरुन निशाणा साधला.
मुंबई महापालिकेचं 2022-23 चा अर्थसंकल्प हा तब्बल 45 हजार 949 कोटींचा इतका आहे. म्हणजेच गोवा, सिक्कीम, नागालँड आणि त्रिपुरा या राज्याचं बजेट जेवढं असतं त्यापेक्षा अधिक एकट्या मुंबईचं बजेट आहे. मुंबई महापालिकेची बँकांमध्ये तब्बल जवळपास 1 लाख कोटींची एफडी आहे.
मुंबई महापालिकेत सलग 25 वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे. 2017 मध्येच भाजपला आपला महापौर करण्याची संधी आली होती. मात्र त्यावेळी युतीच्या सरकारवर परिणाम नको म्हणून फडणवीसांनी शिवसेनेचा मार्ग मोकळा केला.
मुंबई महापालिका 2017च्या निवडणुकीवेळी राज्यात सत्तेत असतानाही, भाजप आणि शिवसेना दोघेही स्वतंत्र लढले होते. त्यावेळी भाजपचे 82 नगरसेवक निवडणूक आले. तर शिवसेनेनं 84 जागा जिंकल्या. विशेष म्हणजे भाजपनं या निवडणुकीत 35 नगरसेवकांवरुन 82 पर्यंत मोठी झेप घेतली.
आता तर परिस्थिती बदललीय. शिवसेनेत उभी फूट पडलीय. उद्धव ठाकरे शिवसेना आणि बाळासाहेबांची शिवसेना असे दोन गट झालेत. त्यामुळं शिंदेंच्या नेतृत्वात बाळासाहेबांची शिवसेना सोबत असल्यानं मुंबईत भाजपसाठी मोठा आधार आहे…आणि शिंदे तर आतापासून ट्रिपल इंजिनचं सरकार येणार असं म्हणतायत.
मुंबई महापालिकेवर भाजपचा भगवा फडकवण्यासाठी गेल्या सप्टेंबर महिन्यापासून भाजपनं तयारी सुरु केलीय..लालबागच्या राजाच्या दर्शनाच्या निमित्तानं अमित शाहांनी मुंबईत बैठक घेतली होती..आणि तसंच पुन्हा आशिष शेलारांना मुंबई भाजपच्या अध्यक्षपदाची धुरा देत, इरादे स्पष्ट केले. आता मोदींनीही मुंबईकरांना आशीर्वाद देण्याचं आवाहन केलंय.