मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या (BMC Elections 2022) तोंडवर भाजपने (Bjp) शिवसेनेविरोधात (Shivsena) रान पेटवलं आहे. कारण मुंबई महापालिका स्थायी समितीत शेवटच्या सभेत शिवसेनेने 6 हजार कोटींचे 370 प्रस्ताव कोणत्याही चर्चेविना मंजूर केले. याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी ‘जागो आयुक्त प्यारे’, ‘भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई करा’, ‘भ्रष्टाचाराला आळा घाला’, ‘करदात्या मुंबईकरांच्या पैश्याची उधळपट्टी थांबवा’, ‘मुंबईकरांना सुसह्य जीवन द्या’, ‘यशवंत जाधवांवर कारवाई करा’ अशा जोरदार घोषणा देत आयुक्तांच्या कार्यालयासमोर तीव्र निदर्शने केली. स्थायी समितीत आलेल्या प्रस्तावात अनेक त्रुटी होत्या. त्यात स्पष्टता नव्हती. याबाबत कुठलीही चर्चा करण्यास अध्यक्षांनी परवानगी दिली नाही. काही प्रस्ताव आदल्या रात्री आले होते. त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होणार आहे. त्यामुळे असे प्रस्ताव मंजूर न करता आयुक्तांनी एक जबाबदार प्रशासक म्हणून पालिकेतील भ्रष्टाचाचाराला आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलावीत अशी आग्रही मागणी भारतीय जनता पक्षाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्व नगरसेवकांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली.
शिवसेनेने प्रेतांच्या टाळूवरील लोणी खाल्ले
गेली तीस वर्षे मुंबईकरांना खोटी आश्वासने देऊन फसवणाऱ्या सत्ताधारी शिवसेनेला आगामी निवडणुकीत जनताच धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. असा इशारा देत भाजपा गटनेते शिंदे यांनी दंड थोपटून शिवसेनेला आव्हान दिले. सत्ताधारी शिवसेनेने सर्वसामान्य मुंबईकरांची घोर फसवणूक केली आहे. मुंबई महानगरपालिकेत जो भ्रष्टाचार, दुराचार, अनाचार पहायला मिळतो आहे तो देशातही कुठे इतका भ्रष्टाचार घडला नसेल; इतकी भयावह परिस्थिती आज पालिकेत पाहायला मिळते. आयुक्तांना हाताशी धरून पालिकेत प्रेतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याइतपत शिवसेनेची मजल गेली आहे. स्थायी समितीत आलेले अनेक प्रस्ताव आदल्या रात्री आले होते. त्यामुळे तीन स्पष्ट दिवस झाले नसल्याने महापालिका कार्यपद्धती नियम व विनियम पृष्ठ क्र.61 वरील स्थायी समितीच्या कार्यपद्धतीसंबंधी नियम व स्थायी समितीचे कामकाज चालविण्यासंबंधी विनिमय मधील नियम 1 प्रमाणे सदस्याने हरकत घेतल्यावर तो प्रस्ताव मंजूर करता येत नाही. परंतु स्थायी समिती अध्यक्षांनी दादागिरीने महापालिका नियम पायदळी तुडवत, लोकशाहीचा गळा घोटत, रेटून सर्व प्रस्ताव मंजूर केले. केवळ कंत्राटदारांच्या दलालीसाठी केलेले स्थायी समिती अध्यक्षांचे हे वर्तन लोकशाहीला काळीमा फासणारे आहे अशी घणाघाती टीका गटनेते शिंदे यांनी केली.
स्थायी समितीच्या अध्याक्षांवर कारवाई करा
महापालिकेत प्रशासक म्हणून आयुक्तांची मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे स्थायी समिती अध्यक्षांनी केलेल्या भ्रष्टाचाराची सखोल तपासणी करून या भ्रष्टाचाराला आळा, पायबंद घालण्यासाठी आणि सामान्य करदात्या मुंबईकरांना न्याय देण्यासाठी भ्रष्टाचारी स्थायी समिती अध्यक्षांवर कठोर कारवाई करावी अशी आग्रही मागणी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी आयुक्तांकडे केली. गेल्या अनेक दिवसांपासून भाजप शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्याविरोधात आक्रमक झाले आहे. यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर विभागाची धाडही काही दिवसांपूर्वीच पडली आहे. यावरूनही भाजप शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न करत आहे.