मुंबई : येत्या 2022 वर्षात मुंबई महापालिकेच्या निवडणुका पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून जोरदार तयारी केली जात आहे. नुकतंच पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे मुंबई शहर आणि उपनगरातील कोळीवाड्यांच्या सीमांकनाबाबत बैठक पार पडली. या बैठकीत मुंबईतील उर्वरीत कोळीवाड्यांचे सीमांकन जलदगतीने पूर्ण करण्यात यावे, अशा सूचना आदित्य ठाकरेंनी दिली. (Shivsena attract koli Voters For BMC election)
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर असलेल्या गुजराती मतदारांना आकर्षिक करण्यासाठी शिवसेनेने मुंबईत ‘मुंबई मा जलेबी ने फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ अशी घोषणा देत जिलेबी, फाफडा आणि वडापावचा मुंबईत बेत आखला होता. या कार्यक्रमाला गुजराती बांधवांना बोलवण्यात आलं होतं. शिवसेनेचे राष्ट्रीय संघटक हेमराज शाह आणि कल्पेश मेहता यांच्या नेतृत्वात या भोजन समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याला गुजराती बांधवांनी चांगला प्रतिसाद दिला होता. त्यानंतर आता शिवसेनेने कोळी बांधवांकडे आपला मोर्चा वळवला आहे.
मुंबई शहर आणि उपनगरातील कोळीवाड्यांच्या सीमांकनाबाबत आदित्य ठाकरे आणि मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली. मुंबईतील उर्वरीत कोळीवाड्यांचे सीमांकन जलदगतीने पूर्ण करण्यात यावे, अशा सूचना यावेळी आदित्या ठाकरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
मुंबईतील उर्वरित कोळीवाड्यांच्या सीमांकनासाठी करावयाची प्रक्रिया जलद पूर्ण करण्यात यावी. यासंदर्भात लवकरच पुन्हा आढावा बैठक घेऊन कोळीवाड्यांच्या सीमांकनाबाबत कार्यवाही करण्यात येईल, असे आदित्य ठाकरेंनी सांगितले.
कोळीवाडे, आदिवासी पाडे किंवा गावठाणाचा भाग लगत आहे तिथे कोळीवाड्याचे सीमांकन करणे गरजेचे आहे. मुंबईतील बहुतांश कोळीवाड्यांचे सीमांकन झाले असून उर्वरित कोळीवाड्यांचे सीमांकन करण्यासाठी संबंधीत यंत्रणांनी लवकर सर्वेक्षण करावे, अशा सूचना अस्लम शेख यांनी दिल्या. यावेळी मुंबई शहर आणि उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही जिल्ह्यातील कोळीवाडे सीमांकनाबाबतच्या सद्यस्थितीची माहिती दिली.
निवडणुकी आधी मोर्चेबांधणी
मुंबई महानगरपालिका हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे यावेळी शिवसेनेने मुंबई राखण्यासाठी गुजराती मतदारांना जागृत करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. शिवसेनेने या आधी 10 जानेवारी रोजी गुजराती बांधवांचा मेळावा आयोजित केला होता. ‘मुंबई मा जलेबी ने फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ म्हणत शिवसेनेकडून गुजराती समाजासाठी मेळाव्याचं आयोजन करण्यात आले होते. अंधेरी-ओशिवरा इथल्या गुजरात भवनातील नवनीत हॉलमध्ये हा मेळावा पार पडला होता. या मेळाव्यात 100 गुजराती व्यापारी उपस्थित राहिले होते.त्यानंतर पुन्हा दुसऱ्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. कोरोना असल्यामुळे या कार्यक्रमात कोरोना नियमांचं पालन करण्यात येणार आहे. तसेच प्रथम येणाऱ्या शंभर लोकांनाच सभागृहात प्रवेश देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला शिवसैनिकही उपस्थित राहणार असल्याचं हेमराज शाह आणि कल्पेश मेहता यांनी सांगितलं. (Shivsena attract koli Voters For BMC election)
संबंधित बातम्या :
‘जिलेबी-फाफडा डिप्लोमसी’ सक्सेस, आता ‘रासगरबा’; 21 गुजराती उद्योगपतींचा रविवारी शिवसेनेत प्रवेश!