मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या शिवतीर्थावरील दसरा मेळाव्याची परंपरा यंदा खंडित होणार आहे. त्यामुळं शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा शिवाजी पार्क इथल्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात घेतला जाणार असल्याची माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत दिली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याची धुरा हाती घेतल्यानंतर शिवसेनेचा हा पहिलाच दसरा मेळावा असणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सार्वजनिक कार्यक्रमांवर अद्यापही बंधनं कायम आहेत. त्यामुळं शिवसेनेचा शिवतीर्थावरील दसरा मेळावा आता स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात घेतला जाणार असल्याची माहिती मिळतेय. (Mumbai Shivsena dasra melava in sawarkar smarak)
राज्य सरकारनं कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही अंशी अनलॉक केलं असलं तरी सार्वजनिक कार्यक्रमांवरील निर्बंध अद्याप उठवलेले नाहीत. त्यामुळं सण-उत्सव साजरे करण्यावर अजूनही बंधनं कायम आहेत. त्यापार्श्वभूमीवर शिवसेनेचा दसरा मेळावा व्यासपीठावरच होणार अशी भूमिका संजय राऊत यांनी मांडली होती. त्यानुसार मेळाव्याचं स्वरुप काय असावं? तो कसा घेतला जावा? यावर चर्चा सुरु आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केल्यापासून शिवतीर्थावर दसरा मेळावा होत आला आहे. त्यापार्श्वभूमीवर शिवाजी पार्कमधील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकातील सभागृहात दसरा मेळावा घेण्याचा प्रस्ताव पुढे आला. स्मारकाच्या सभागृहात मेळाव्याचं व्यासपीठ उभं करुन शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं भाषण लाईव्ह प्रसारित केलं जाईल, अशी सूचना मांडण्यात आली. तर पक्षाचे नेते आणि लोकप्रतिनिधींपैकी अगदी मोजक्या व्यक्तींनाच सभागृहात प्रवेश दिला जाईल अशीही शक्यता आहे.
महाराष्ट्रात ठाकरे घराण्यातील पहिलीच व्यक्ती मुख्यमंत्रीपदी विराजमान झाली आहे. त्यामुळे हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी दसरा मेळावा धुमधडाक्यात साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र यंदा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अनेक सार्वजनिक कार्यक्रम, सण, उत्सवांवर पाणी फेरले गेले आहे. त्यामुळे दसरा मेळाव्याच्या सोहळ्याबाबतही साशंकता व्यक्त केली जातेय.
संबंधित बातम्या:
Mumbai Shivsena dasra melava in sawarkar smarak