आमचं शरीर वाघाचं आणि काळीज उंदराचं नाही, महाभारतातील योद्धे आम्हीच, मी तर ‘संजय’; राऊतांचा भाजपवर पलटवार

| Updated on: Jun 21, 2021 | 11:06 AM

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या लेटर बॉम्बनंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर हल्ला चढवला आहे. सत्ता गेल्यापासून काही लोकांची पोटदुखी सुरू झाली आहे. (sanjay raut)

आमचं शरीर वाघाचं आणि काळीज उंदराचं नाही, महाभारतातील योद्धे आम्हीच, मी तर संजय; राऊतांचा भाजपवर पलटवार
संजय राऊत, खासदार, शिवसेना
Follow us on

मुंबई: शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या लेटर बॉम्बनंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर हल्ला चढवला आहे. सत्ता गेल्यापासून काही लोकांची पोटदुखी सुरू झाली आहे. त्यामुळे विनाकारण त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण आम्ही घाबरणार नाही. आम्ही वाघाच्या काळाजाची माणसं आहोत. आमचं शरीर वाघाचां अन् काळीज उंदराचं असं नाही. महाभारतातील योद्धे आम्हीच आहोत, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपवर हल्ला चढवला. (shivsena leader sanjay raut attacks bjp over pratap sarnaik letter)

संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना हा हल्ला चढवला. आम्ही वाघाच्या काळजाचे माणसं आहोत. आमचं शरीर वाघाचं आणि काळीज उंदराचं यात आम्ही मोडत नाही. आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे शिलेदार आहोत. आज आम्ही राजकारणात नाहीये. एक जमाना लोटलाय. पांढरे झाले. परत काळे करत आहोत. फार फार काय कराल, तुरुंगात टाकाल. आमची तयारी आहे तुरुंगात जायला. आम्ही महाभारताची उदाहरणे देतो. त्या महाभारतातील योद्धे आम्हीच आहोत, असं सांगतानाच माझं नाव संजय आहे, असा इशारा राऊत यांनी दिला.

तिन्ही पक्ष घट्ट नात्याने जोडलेले

महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकमेकांशी घट्ट नात्याने जोडले आहेत. प्रत्येकजण आपआपल्या पक्षाचा विस्तार करतो. आम्हीही करत असतो. काँग्रेस-राष्ट्रवादीही करत आहे. पक्षाचा विस्तार केला पाहिजे. पण कोणी कोणत्या पद्धतीने लढायचं हे अद्याप ठरायचं आहे. तसेच हे सरकार पाच वर्ष चालवायचं ही तीन पक्षाची कमिटमेंट आहेत. कॉमन मिनिमम प्रोग्राम हाच सरकार चालवण्याचा पाया आहे, असं राऊत यांनी सांगितलं.

कितीही फूट पाडा, पाच वर्षे सरकार टिकणार

आम्ही सत्तेत असल्याने काही लोकांची पोटदुखी वाढली आहे. त्यांनी काहाही कितीही फूट पाडण्याचा प्रयत्न केला तरी सरकार पाच वर्षे चालणारच, असं सांगतानाच आघाडीतील तिन्ही पक्षाचा उत्तम समन्वय आहे. आघाडी सरकारचा समन्वय कसा असावा याचं हे उत्तम उदाहरण आहे. हा देशातील आदर्श समन्वय आहे, त्यांनी सांगितलं.

याला फ्रस्टेशन म्हणतात

ज्यांच्याकडे ईडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआय आहे. ते प्रेशर टॅक्टिस वापरत आहेत. पश्चिम बंगालमध्ये तेच झालं. पण ते महाराष्ट्रात चालणार नाही. महाराष्ट्रात आता जे सुरू आहे, त्याला फ्रस्टेशन असं म्हणतात, असा टोला त्यांनी लगावला.

दोन गट नाही

सरनाईक यांच्या पत्रामुळे शिवसेनेत दोन गट असल्याची चर्चा आहे. त्याचा राऊत यांनी इन्कार केला. शिवसेनेत एकच ग्रुप आहे. तो म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचा. शिवसेनेत कोणतीही गटबाजी नाही. कोणतेही गट नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

उद्धव ठाकरेच भूमिका घेतात

सरनाईक त्रासात आहेत अडचणीत आहेत. त्यांचं कुटुंब अडचणीत आहे. त्याचं कारण पत्रात दिलं आहे. भाजप विनाकारण त्रास देत आहे असं सरनाईक यांनी म्हटलं आहे. त्या त्रासातून मुक्त होण्यासाठी मोदींशी जुळवून घ्यावं, असं ते म्हणतात. ते त्यांचं मत आहे.पण पक्षाची भूमिका उद्धव ठाकरे घेत असतात. त्यांचा विनाकारण त्रासातून मुक्तता कशी करायची हे आम्ही पाहू, असं सांगतानाच संपूर्ण शिवसेना सरनाईक यांच्या कुटुंबाच्या पाठिशी उभी आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. (shivsena leader sanjay raut attacks bjp over pratap sarnaik letter)

 

संबंधित बातम्या:

राम शिंदेंच्या मुलीचा विवाह सोहळा, रोहित पवार-फडणवीस आमनेसामने आले आणि…

“जर जेलमध्ये जायचं नसेल तर भाजपसमोर गुडघे टेका, पण माफी मिळणार नाही”

पुण्यातील गर्दीला अजित पवार, त्यांच्यावरही गुन्हा दाखल करा, प्रविण दरेकर आक्रमक

(shivsena leader sanjay raut attacks bjp over pratap sarnaik letter)