मुंबई : शिवसेनेचं (Shivsena) नाव आणि पक्षाचं चिन्ह धनुष्यबाण एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदार खासदार अयोध्या दौरा करणार, असं जाहीर करण्यात आलं होतं. काही दिवसांपूर्वी या दौऱ्याची तारीखही सांगण्यात आली. आज एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याचा टीझर जारी करण्यात आलाय. महाराष्ट्र, हिंदुत्व, रामराज्य, जनतेची सेवा, असे मुद्दे या टिझरवरून अधिक ठसवण्याचा प्रयत्न केला गेलाय. सोशल मीडियावर हा टिझल वेगाने व्हायरल होतोय. विशेष म्हणजे टिझरची टॅगलाइन अधिक लक्ष वेधून घेतेल. अयोध्या में शंखनाद… आ रहे है एकनाथ अशी ही टॅगलाइन असून राजकीय वर्तुळात यावरून चर्चा रंगली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीने जारी करण्यात आलेल्या टीझरमध्ये महाराष्ट्रात रामराज्य असल्याचं भासवण्यात आलंय. तसेच महाराष्ट्र एक सुशासित राज्य असे दर्शवण्यात आले आहे. जिथे सामान्य जनता हा एक परिवार आहे तर जनतेची सेवा, मानव सेवा सर्वोपरि आहे, असं सांगण्यात आलंय. जिथे भगव्याला कधीही डावललं जाणार नाही, रग रग में राम, कण कण में… अशा प्रकारे ओळी वापरून हिंदी भाषेतून हा टिझर बनवण्यात आलाय. तर सर्वात अखेरीस अयोध्या में शंखनाद… आ रहे है एकनाथ अशी टॅगलाइन देण्यात आली आहे. एकूणच, भगवा, हिंदुत्व आणि रामराज्य ही प्रतिमा जनमानसावर ठसवण्याचा प्रयत्न यातून करण्यात आलाय.
Eknath Shinde Ayodhya Daura | अयोध्या में शंखनाद, आ रहे है एकनाथ… शिवसेनेच्या अयोध्या दौऱ्याचा टिझर समोर#CMEknathShinde #Hindutwa #Ayodhya #RamMandir #MaharashtraPolitics #tv9marathi pic.twitter.com/IE7YG28zEd
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 5, 2023
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार आणि खासदार, काही महत्त्वाचे पदाधिकारी हे येत्या 9 एप्रिल रोजी अयोध्या दौऱ्यावर जात आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय दिल्यानंतरच एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याची चर्चा रंगली होती. अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या चरणी धनुष्यबाणाची महापूजा केली जाईल आणि त्यानंतर महाराष्ट्रभरातील विविध जिल्हे आणि तालुक्यांमध्ये हा धनुष्य जनतेपर्यंत फिरवला जाईल, असा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा प्लॅन आहे. एकनाथ शिंदे समर्थित शिवसेनेचं पक्षसंघटन आणि प्रतिमा दृढ करण्यासाठी ही मोठी योजना असल्याचं म्हटलं जातंय. अयोध्या दौऱ्यातून याची सुरुवात होणार आहे. एकिकडे उद्धव ठाकरे गटाकडून सहानुभूतीची लाट असताना एकनाथ शिंदे यांचा हिंदुत्व ठसवण्याचे प्रयत्न किती यशस्वी होतात, याकडे जनतेचं लक्ष लागलंय.