मुंबई : जबाबदारी दिली तर कुणाला नको आहे, असे वक्तव्य शिंदे गटातील नेते संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी केले आहे. संतोष बांगर यांनी मुंबईत येऊन जोरदार शक्तीप्रदर्शन करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला. यावेळी त्यांना मंत्रीपदाबद्दल विचारले असता त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे. हिंगोलीचे आमदार असलेले संतोष बांगर यांनी हिंगोली ते मुंबई असा 700 किलोमीटरचा प्रवास करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निवासस्थान गाठले. या मार्गावरून शेकडो शिवसैनिकांची रॅली (Shivsainik’s rally) घेऊन त्यांनी प्रवास केला. यावेळी एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या नावाने कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते त्यांचा सत्कारही करण्यात आला. दरम्यान, त्यांचे हे शक्तीप्रदर्शन मंत्रीपदासाठी असल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे.
प्रश्न – कारकर्त्यांच्या भावना होत्या मुख्यमंत्री यांचा सत्कार करावा, कार्यकर्ते खूश झाले?
उत्तर – मुंबईत आल्यानंतर सर्व शिवसैनिक खूश झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला एवढा वेळ आतापर्यंतच्या एकाही मुख्यमंत्र्याने दिला नाही.
प्रश्न – हे शक्ती प्रदर्शन मंत्री पदासाठी केल्याचे बोलले जात आहे. यात काही तथ्य आहे?
उत्तर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मानसन्मान करण्यासाठी आम्ही सर्व गेलो आणि जर पक्षाने जबाबदारी दिली, तर ती कोण नाकारणार आहे.
प्रश्न – मुख्यमंत्री आणि तुम्ही चर्चा करताना मुख्यमंत्री तुम्हाला म्हणाले जिल्हा प्रमुख तुम्हीच आहात त्यावेळी तुमच्या चेहऱ्यावर हसू फुलले?
उत्तर – जिल्हा प्रमुख मीच आहे, तर हसू फुलल्याचा विषयच कुठे आला? काल जसे मीडियामध्ये सांगितले, की माझी जिल्हाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली. पण मला असे वाटते, की माननीय उद्धव ठाकरे साहेबांचा हा निर्णय नाही. हा निर्णय म्हणजे पक्षाची दिशाभूल करण्याचे काम आहे. त्यामुळे मी जिल्हा प्रमुख आहे आणि राहणार.
मुसळधार पाऊस, पूरस्थिती असतानाही हिंगोली ते मुंबई 700 किलोमीटरचा प्रवास करून आपण आल्याबद्दल शिवसैनिकांचे अभिनंदन, असे कौतुक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. ते म्हणाले, संतोष बांगर यांचे पद आणि ताकद विशेष सांगायची गरज नाही. हिंगोली मतदारसंघातील ते लोकप्रिय आमदार आहेत. एक सर्वसामान्य कार्यकर्ता आमदार म्हणून तुम्ही विधानसभेत पाठवला, त्याबद्दल शिवसैनिकांचे मी आभार मानतो. तुमच्या एकनाथ शिंदे आणि 50 आमदारांची दखल राज्यात, देशात नाही तर जगाने घेतली आहे, असे शिंदे म्हणाले.