“वन नेशन, वन इलेक्शनचे ढोल वाजवतात, पण सिनेट निवडणुका घेण्याची हिंमत नाही”, संजय राऊतांचा घणाघात

| Updated on: Sep 21, 2024 | 10:38 AM

येत्या रविवारी 22 सप्टेंबरला होणारी मुंबई विद्यापीठाची निवडणूक पुढील आदेश मिळेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. याबद्दल मुंबई विद्यापीठाकडून एक परिपत्रकही जारी करण्यात आले

वन नेशन, वन इलेक्शनचे ढोल वाजवतात, पण सिनेट निवडणुका घेण्याची हिंमत नाही, संजय राऊतांचा घणाघात
Follow us on

Sanjay raut on Senate Election Postpone : मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक दुसऱ्यांदा स्थगित करण्यात आली आहे. येत्या रविवारी 22 सप्टेंबरला होणारी मुंबई विद्यापीठाची निवडणूक पुढील आदेश मिळेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. याबद्दल मुंबई विद्यापीठाकडून एक परिपत्रकही जारी करण्यात आले आहे. आता यावरुन राजकारण तापलं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावरुन राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. “एक देश एक निवडणूक या योजनेचे ढोल वाजवतात, पण आमच्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुका घेण्याची हिंमत त्यांच्यात नाही”, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.

संजय राऊत यांनी नुकतंच एक पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांना मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका स्थगित करण्यावरुन प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी थेट भाष्य केले. यावेळी त्यांनी केंद्र सरकारसह राज्य सरकारवरही ताशेरे ओढले.

“डरपोक शिंदे सरकारने दुसऱ्यांदा निवडणूक रद्द केली”

“शिवसेना या निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरली आहे. त्यातील सर्वच्या सर्व जागा शिवसेना जिंकतेय. हे दिसून आल्यावर डरपोक शिंदे सरकार ज्यांना कोणत्याही निवडणुकांना सामोरी जाण्याची हिंमत नाही. जिथे पैशांची मस्ती चालते तिथेच हे निवडणुकांना सामोरे जातात. पण या निवडणुकीत सुशिक्षित पदवीधर मतदान करतात आणि आपल्या विद्यापीठाला दिशादर्शक असे काम करतो. ही निवडणूक आपण हरतोय हे लक्षात आल्यावर डरपोक शिंदे सरकारने ही निवडणूक दुसऱ्यांदा रद्द केली”, असे संजय राऊत म्हणाले.

“सिनेटच्या निवडणुका घेण्याची हिंमत नाही”

“मला नरेंद्र मोदी आणि त्यांच्या एकंदर कारभाराचेही आश्चर्य वाटते. ते लोकशाहीच्या मुद्द्यावर मोठमोठी भाषण करतात. निवडणूक आयोगाचा संबंध नसला तरी मुंबईत विद्यापीठाचे कुलगुरू हे या सरकारच्या बोळाने दूध पितात का, हा आमचा सरळ प्रश्न आहे. जे कुबड्यांचे सरकार एक देश एक निवडणूक या योजनेचे ढोल वाजवतात, पण आमच्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुका घेण्याची हिंमत त्यांच्यात नाही”, अशी टीका संजय राऊतांनी केली.

“दोनदा सिनेटच्या निवडणुका रद्द झाल्या आहेत. मुंबई महापालिकेची निवडणूक घेण्याची हिंमत नाही. मुंबई विद्यापीठाची निवडणूक घेण्याची हिंमत नाही. मग तुम्ही कोणत्या निवडणुका घेणार? ज्या निवडणुका तुम्हाला पैशांच्या जोरावर जिंकू शकता, ईव्हीएमचा गैरवापर करुन जिंकू शकता, पोलीस यंत्रणेचा वापर करुन तुम्ही जिंकू शकता या अशाच निवडणुकांना तुम्ही सामोरे जाणार. पण जिथे लोकांची मतं विकत घेता येत नाही, जिथे ईव्हीएम नाही, तिथे निवडणुका घेण्याची तुमची हिंमत नाही. हे पुन्हा एकदा दिसून आलं आहे. या निवडणुका रद्द करुन त्यांनी संपूर्ण पदवीधर तरुण वर्गाचा त्यांनी रोष ओढवून घेतला आहे. हा संताप ओढवून घेतला आहे”, असेही संजय राऊत म्हणाले.