“रतन टाटा यांना भारतरत्न द्या”, शिंदे गटाच्या नेत्याची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र

| Updated on: Oct 10, 2024 | 11:22 AM

त्यातच आता शिंदे सेनेच्या सोशल मीडियाचे राज्यप्रमुख राहुल कनाल यांनी रतन टाटांना भारतरत्न द्या, अशी मोठी मागणी केली आहे.

रतन टाटा यांना भारतरत्न द्या, शिंदे गटाच्या नेत्याची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
रतन टाटा
Follow us on

Ratan Tata Passed Away : टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा आणि जगातील मोठे उद्योगपती रतन टाटा यांचे काल निधन झाले. त्यांच्या निधनामुळे उद्योगजगतावर नव्हे तर संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. रतन टाटा यांच्यावर वरळीतील स्माशनभूमीत पार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. रत्न टाटा यांच्या निधनानंतर देशभरातून मान्यवरांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. तसेच सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. त्यातच आता शिंदे सेनेच्या सोशल मीडियाचे राज्यप्रमुख राहुल कनाल यांनी रतन टाटांना भारतरत्न द्या, अशी मोठी मागणी केली आहे.

राहुल कनाल यांनी नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी रतन टाटांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. त्यासोबतच राहुल कनाल यांनी रतन टाटा यांच्या उद्योग क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल भारतरत्न द्या, अशी मागणी पत्राद्वारे केली आहे.

राहुल कनाल पत्रात काय म्हणाले?

भारतीय व्यवसाय क्षेत्रातील एक प्रतिष्ठित व्यक्ती रतन टाटा यांच्या निधनाप्रती मी दुःख व्यक्त करतो. त्यांचे कॉर्पोरेट क्षेत्रापलीकडे सामाजिक कार्यात मोठे योगदान होते. रतन टाटा हे केवळ दूरदृष्टी असलेले उद्योजकच नव्हे तर एक दयाळू व्यक्तीमत्त्वही होते. त्यांच्या पशूप्रेमाची सर्वांनाच कल्पना आहे. त्यांनी लाखो भटक्या श्वानांची मदत करत त्यांना नवं जीवन दिले होते. त्यासोबच त्यांनी गरजूंसाठी कॅन्सर रुग्णालय उभारले. रतन टाटा यांनी समाजातील अनेक घटकांना निस्वार्थीपणाने मदत केली.

रतन टाटा यांनी फक्त उद्योग क्षेत्रातच नव्हे तर सामाजिक बांधिलकी जपत भरीव योगदान केले आहे. त्यांच्या या योगदानाच्या आधारावर भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान असलेला भारतरत्न पुरस्कारासाठी रतन टाटांच्या नावाची शिफारस करावी, अशी मागणी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे करत आहे. रतन टाटा यांना या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित केल्याने केवळ त्यांच्या वारसांचा सन्मान होणार नाही, त्यासोबतच असंख्य लोकांना त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून देशाच्या सामाजिक-आर्थिक परिस्थितीत सकारात्मक योगदान देण्यासाठीची प्रेरणा मिळेल.

माझा विश्वास आहे की आपल्या समाजात परोपकार आणि करुणा ही संस्कृती वाढवण्यासाठी अशा असामान्य व्यक्तींचा सन्मान करणे आवश्यक आहे. त्यामुळे माझी ही विनंती कृपया विचारात घ्यावी, असे राहुल कनाल यांनी पत्रात नमूद केले आहे.

रतन टाटा यांच्यावर वरळीत अंत्यसंस्कार

रतन टाटा यांचे पार्थिव सध्या त्यांच्या हलेकाय या राहत्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. यानंतर सकाळी १० वाजता हलेकाय येथून त्यांचे पार्थिव नरीमन पॉईंट येथील एनसीपीए याठिकाणी हलवण्यात येईल. यानंतर सकाळी १० ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत सर्वसामान्य लोकांना एनसीपीए या ठिकाणी टाटा यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेता येईल. एनसीपीएच्या प्रवेशद्वार क्रमांक ३ मधून लोकांना अंत्यदर्शनासाठी प्रवेश दिला जाईल, तर प्रवेशद्वार क्रमांक २ मधून नागरिकांना दर्शन घेऊन बाहेर पडता येईल.

यानंतर दुपारी ३.३० वाजता टाटा यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी वरळीच्या दिशेने रवाना होईल. यानंतर संध्याकाळी ४ वाजता मरीन ड्राईव्ह मार्गे पेडर रोडवरुन ही अंत्ययात्रा वरळीतील स्मशानभूमीत पोहचेल. यानंतर सायंकाळी ४.३० वाजता टाटांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात पारसी पद्धतीने अंत्यसंस्कार केले जातील.