मुंबई : सारा राजकीय आरोप-प्रत्यारोपाचा भाग झाला, पण गुलाबरावांनी शिंदेंचं मराठा कार्ड का बाहेर काढलं, त्यावरुन जळगावात काय चर्चा आहेत. ते पाहूयात.
गुलाबराव पाटील जळगाव ग्रामीण मतदारसंघातून निवडून येतात. शिवसेना फुटीनंतर गुलाबरावांच्या विरोधात राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर आणि ठाकरे गटाचे गुलाबराव वाघ या दोघांनी निवडणुकीची तयारी सुरु केलीय 3 गुलाबराव आणि जातीचं समीकरण जळगाव ग्रामीणमध्ये महत्वाचं आहे.
2009 च्या विधानसभेत राष्ट्रवादीच्या गुलाबराव देवकरांनी शिवसेनेच्या गुलाबराव पाटलांचा पराभवही केला होता. जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात 60 ते 65 हजार मराठा, 35 ते 40 हजार माळी, 40 हजार लेवा, 25 ते 30 हजार चौधरी समाज,15 ते 20 हजार गुजर पाटील, 15 ते 18 हजार कोळी समाज आणि इतर 20 ते 25 मतदार आहेत.
गुलाबराव पाटील गुजर समाजातून, तर गुलाबराव देवकर आणि गुलाबराव वाघ हे मराठा समाजातून येतात. 2019 मध्ये गुलाबराव पाटलांविरोधात मराठा उमेदवार नव्हता. त्यावेळी पुष्पा महाजन आणि भाजपचे बंडखोर चंद्रशेखर अत्तरदेंचं आव्हान होतं. मात्र यावेळी राष्ट्रवादीच्या गुलाबराव देवकरांसहीत ठाकरे गटाच्या गुलाबराव वाघांनीही विधानसभेची तयारी केल्यामुळे शिवसेनेच्या गुलाबराव पाटलांनी मुख्यमंत्र्यांचं मराठा कार्ड खेळल्याची चर्चा आहे.