Uddhav Thackeray Dussehra Melava : राज्यातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. सध्या सर्वांचेच लक्ष शिवसेनेच्या पारंपारिक दसरा मेळाव्याकडे लागले आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेत ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट पडले होते. त्यामुळे यंदाचा शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा कुठे होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. अखेर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याचे ठिकाण जाहीर केले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली. उद्धव ठाकरेंनी दादरच्या शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली. यावेळी गोंधळ गीताचा अनावरण सोहळा पार पडला. या सोहळ्यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्याबद्दल भाष्य केले.
“आजपासून नवरात्री सुरू होत आहे. मी आपल्या माध्यमांच्या माध्यमातून नवरात्रीच्या शुभेच्छा देतो. परंपरे प्रमाणे आपण दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कात भेटणार आहोतच. आज नवरात्र सुरू होत आहे. जगदंबेचा उत्सव आहे. महिषासूर मर्दिनी, असूरांचा वध करून, जे आसूर माजले होते, त्याचा वध करणाऱ्या मातेचा दिवस आहे”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
“आजची राजकीय पत्रकार परिषद नाही. राज्यात जे अराजक माजलं आहे. त्यावर एक गाणं आलं आहे. राज्यात तोतयेगिरी सुरू आहे. असंच अराजक शिवाजी महाराजांच्यावेळी राज्यावर आलं होतं. तेव्हा एकनाथांनी बये दार उघड आरोळी मारली होती. या तोतयेगिरीचा नायनाट करण्यासाठी आपण गाणं तयार केलं आहे. देवी आणि जनतेच्या चरणी सादर करत आहोत. गाणं ऑडिओ आहे”, असेही उद्धव ठाकरेंनी सांगितले.
“सध्या अराजक माजलं आहे. त्यामुळे आम्ही अराजकीय गाणं आणलं आहे. दसऱ्याला सर्व गोष्टींचा फडशा पाडणार आहे. आता सणासुदीचे दिवस आहेत. कर्तव्याला कोणी विसरू नये म्हणून गाण्याच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत. ज्यांना बोलायचं ते बोलू द्या. नंतर सो सुनार की एक लोहार की.. होईलच”, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.