मुंबई : देशभरातील कामागार संघटना सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा विरोध करण्यासाठी 26 नोव्हेंबरला देशव्यापी बंद पुकारणार आहे. शिवसेना या देशव्यापी बंदमध्ये सहभागी होणार आहे. मात्र या बंदमध्ये आपत्कालीन सेवा आणि बेस्टचे कर्मचारी सहभागी होणार नाहीत, अशी माहिती शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई यांनी दिली आहे. (ShivSena will participate in the nationwide strike of workers : MP Anil Desai)
शिवसेना भवन येथे भारतीय कामगार सेना युनियनच्या पदाधिकाऱ्यांची आज बैठक झाली. या बैठकीत माजी खासदार आनंदराव अडसूळ, खासदार अनिल देसाई, विनोद घोसाळकर आणि शिवसेनेच्या कामगार सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्रातील 12 कामगार संघटना कृती समितीत शिवसेनेचे सदस्य आहेत. त्यामुळे केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणाचा विरोध करण्यासाठी शिवसेना या बंदमध्ये सहभागी होणार आहे.
शिवसेनेचा कामगार विधेयकाला विरोध आहे, त्यामुळेच शिवसेनेने या बंदला पाठिंबा दर्शवला आहे. तसेच काही कामगारांना सरकारने कमावरुन काढण्याचा जो निर्णय घेतला आहे, त्याला शिवसेनेने कडाडून विरोध केला आहे. तसेच कंत्राटी पद्धतीच्या कामगारांना काढून टाकण्याबाबत केंद्र सरकारने जो निर्णय घेतला आहे, त्याला विरोध करण्यासाठी शिवसेनेने या बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.
कृषी विधेयकानंतर केंद्र सरकारने सप्टेंबर महिन्यात कामगार कायद्यांमध्ये सुधारणा सुचवणारी तीन विधेयकं मंजूर केली. एकूण 44 कामगार कायदे 4 विधेयकांमध्ये बसवले आहेत. त्यापैकी एक म्हणजे रोजंदारी किंवा पगाराविषयीचं विधेयक गेल्यावर्षी हिवाळी अधिवेशनात पारित झालं आहे. उर्वरित तीन विधेयकांवरही शिक्कामोर्तब झाले आहे.
शेकापकडूनही भारत बंदची हाक
शेतकरी-कामगार विरोधी कायद्यांना विरोध म्हणून शेकापच्या वतीने आमदार जयंत पाटील यांनी 26 नोव्हेंबरला भारत बंदची हाक दिली आहे. यावेळी या कायद्यांना विरोध करण्यासाठी शेतकरी व कामगार संघटनांनी एकत्र यावे, असं आवाहन जयंत पाटील यांनी केलं आहे.
कामगार कायदा कामगारांना देशोधडीला लावेल : राष्ट्रवादी
‘केंद्र सरकारने आणलेले नवीन कामगार कायदे कामगारांना देशोधडीला लावतील, असे वक्तव्य काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी केले होते.
शेतकरी-कामगार विरोधी कायद्यांना विरोध, 26 नोव्हेंबरला शेकापकडून भारत बंदची हाक
(ShivSena will participate in the nationwide strike of workers : MP Anil Desai)