मुंबई : बॉडीबिल्डिंग क्षेत्रात पुरुषांची मक्तेदारी असते असे म्हटले (Super Women Shraddha Dhoke) जाते. मात्र लग्नानंतर आणि दोन मुलांच्या बाळंतपणानंतरही वयाच्या चाळीशीत विशीतील तरुण-तरुणींना लाजवेल अशी शरीरयष्टी विरारच्या श्रद्धा ढोके यांनी केली आहे. त्यासोबतच त्यांनी आतापर्यंत अनेक शरीरसौष्ठव स्पर्धा जिंकण्याच्या पराक्रम केला आहे. विशेष म्हणजे श्रद्धा ढोके यांनी आपले 110 किलो वजन 48 किलोपर्यंत घटवले आहे (Super Women Shraddha Dhoke).
वयाच्या 43 व्या वर्षी त्यांच्याहून 15-20 वर्ष लहान असणाऱ्या तरुण-तरुणींसोबत स्पर्धांमध्ये उतरणाऱ्या श्रद्धा यांनी एका स्त्रीच्या नाजूक आणि कोमलतेची जणू व्याख्याच बदलून टाकली आहे. मनात जिद्द असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही आणि असे म्हणणाऱ्या श्रद्धा यांचा बॉडीबिल्डिंगमधील हा प्रवास एका सिनेमासारखाच आहे. तब्बल 110 किलोपासून 48 किलोपर्यंत वजन घटवून त्यांनी हे संपूर्ण जगाला पटवून दिले आहे.
मूळच्या नगरच्या असणाऱ्या श्रद्धा यांचा जन्म 20 सप्टेंबर 1978 रोजी गोरेगावमध्ये झाला. श्रद्धा यांची मूळ घरची परिस्थिती हलाखीची होती. तरीदेखील मोठ्या जिद्दीने त्यांनी 12 वी पर्यंत मराठी माध्यमातून शिक्षण पूर्ण केले. आणि घरी शिकवण्या घेऊन त्यांनी त्याचे बी. कॉमपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. मात्र हे करताना त्यांनी कधीच शरीराकडे लक्ष दिले नाही. यामुळे शाळेत असल्यापासून त्यांचे वजन वाढतच राहिले असल्याचे श्रद्धा सांगतात.
बी. कॉममधील कॉलेजमध्ये शिकताना त्यांची सुहास ढोके यांच्यासोबत भेट झाली. भेटीचे रूपांतर पुढे मैत्रीत आणि मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. पुढे रीतसर मागणी घालून 2004 साली दोघांचे लग्नही झाले. लग्नाआधीपासून वजन असल्याने पहिल्या बाळंतपणानंतर श्रद्धा यांचे वजन 65 किलोपासून 97 किलोपर्यंत गेले. लग्नांनंतर विरारला शिफ्ट झाल्यापासून बाळंतपणानंतर त्यांनी जिमला जायला सुरुवात केली. आणि 2 वर्षात त्यांनी 48 किलोपर्यंत वजन घटविले.
दररोजच्या फिटनेस रुटीनमुळे त्यांना या क्षेत्राबाबत आकर्षण निर्माण झाले. मात्र इतर मध्यमवर्गीयासारखेच त्यांनीही या क्षेत्राला खर्चिक समजून दुर्लक्ष केले. यानंतर मात्र त्यांच्या जीवनातील कसोटीचा काळ सुरु झाला. 2006 ते 2009 या काळात त्यांचा तीनवेळा गर्भपात झाला. एका आईचे दुःख त्यांनी 3 वेळा सोसले होते. यामुळे त्या पूर्णपणे खचून गेल्या होत्या. त्यांची मानसिक स्तिथी पूर्णपणे ढासळली होती. इतकंच काय तर मनात आत्महत्येचेही विचार येऊ लागले होते. या अवस्थेचा परिणाम त्यांच्या शरीरावर पुन्हा होत गेला आणि वजन वाढू लागले.
अखेर डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर वेळेवेळी घेतलेल्या काळजीमुळे अखेरीस त्यांना 2011 साली पुत्ररत्न प्राप्त झाले. मात्र दुसऱ्यांदा झालेल्या बाळंतपणानंतर त्यांचे वजन 110 किलोपर्यंत वाढले. आधी सोसायटीतील माणसं त्यानंतर नातेवाईक आणि अनोळखी माणसांच्या टोमण्यांमुळे त्यांनी स्वतःला आरशात बघायचेही सोडून दिले होते. त्यांना स्वतःबद्दलच तिरस्कार वाटू लागला होता. अखेरीस त्यांच्या कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा फिटनेसकडे लक्ष द्यायला सुरुवात केली.
वजन कमी करणे हा प्रवास इतका सोपा नव्हता. तरीदेखील त्यांनी हे चॅलेंज स्वीकारले आणि जिममध्ये मेहनत करत त्यांनी 3 वर्षांमध्ये 110 किलोपासून 70 किलोंपर्यंत आपले वजन घटवले. मात्र यावरच त्यांना समाधानी राहावयाचे नव्हते, इतरांपेक्षा आपण वेगळे आहोत आणि आपल्यात काही करून दाखवयाची धमक असल्याचे त्यांना वेळोवेळी वाटत असे, परंतु आर्थिक परिस्थितीमुळे त्या नेहमी मागे हटत होत्या.
आर्थिक परिस्थितीतवर मात करण्यासाठी त्यांनी आपल्या राहत्या घरीच झुंबा आणि पॉवरयोगा क्लास सुरु केला. घरगुती क्लासेसमधून मिळणाऱ्या मोबदल्यातून त्यांनी आपल्या फिटनेसची जर्नी सुरूच ठेवली आणि फक्त बारा महिन्यांमध्ये 48 किलोपर्यंत आपले वजन आणले. याचदरम्यान त्यांनी जिम ट्रेनरसाठीचा के-11 फिटनेस कोर्स पूर्ण केला. श्रद्धा यांचे आधी फक्त बॉडीबिल्डिंगकडे लक्ष होते. मात्र आपण इतरांपेक्षा तिप्पट पटीने वजन उचलू शकतो हे लक्षात आल्यावर 2017 मध्ये त्यांनी पॉवरलिफ्टिंगमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला.
श्रद्धा यांची एकाग्रता आणि जिद्द याला अखेरीस यथोचित सन्मान मिळाला जेव्हा त्यांना त्यांच्या पहिल्याच पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत 4 सुवर्णपदके मिळाली आणि सर्वोत्तम खेळाडू म्हणून त्यांना गौरविण्यात आले. यानंतर महाराष्ट्र श्री मध्येही कांस्यपदक मिळविले. यामध्ये त्यांची मिस इंडिया स्पर्धेत निवड झाली. आपल्या पहिल्या राष्ट्रीय स्पर्धेतही त्यांनी चमक दाखवत टॉप 10 मध्ये स्थान मिळविले. यासोबतच जमशेदपूरमध्ये झालेल्या सुब्रतो आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी 4 सुवर्णपदकांसहित स्ट्रॉगेस्ट वूमन ऑफ चॅम्पिअनशिप हा किताब मिळविण्याच्या भीमपराक्रम केला होता. याचदरम्यान त्यांनी पॉवरलिफ्टिंगसोबत बॉडीबिल्डिंग क्षेत्रातही मुंबई श्री आणि महाराष्ट्र श्री मध्ये चमकदार कामगिरी नोंदवत अनेकांची मने जिंकली.
बॉडीबिल्डिंग स्पर्धेत स्वतःला सिद्ध करताना सर्वात मोठी समस्या असते ती सर्वांसमोर बिकिनीवर उतरण्याची, समाज काय बोलेल ? नातेवाईक काय म्हणतील या विचाराने आधी श्रद्धा यांना सुद्धा संकोच वाटला होता, मात्र समर्थांची निस्सीम भक्त असणाऱ्या श्रद्धा यांनी आपल्या कपाळाला समर्थांचा टिळा लावीत बिकिनी घालत हेही आव्हान लीलया पेलले. आपल्या देशात खेळापेक्षा महिलेने काय कपडे घातले होते याविषयी जास्त चर्चा होते. त्यामुळे या क्षेत्राकडे महिला खूप कमी प्रमाणात वळतात अशी खंत श्रद्धा यांनी व्यक्त केली.
राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर आपली चमक दाखविल्यानंतर त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला दबदबा निर्माण करायचा आहे. जागतिक पातळीवर प्रतिष्ठेची मानल्या जाणाऱ्या ऑलिंपिया स्पर्धेत त्यांना भारताचे प्रतिनिधित्व करायचे आहे. आतापर्यत या स्पर्धेत भारताकडून एकही महिलेची निवड झाली नसून वयाच्या चाळीशीत त्यांना हे लक्ष साध्य करून तरुणांसाठी एक आदर्श ठेवायचा आहे.
जागतिक पताळीवरील स्पर्धेचा एकूण खर्च आणि रोजचा फिटनेसविषयक खर्च त्यांना स्वतःला उचलावा लागत असल्याने त्यांना तुमच्या आमच्याकडून मदतीची गरज आहे. यास्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी त्यांनी काटकसर करून आपली जमापुंजी वाहिली आहे. यासोबतच आपले दागिनेही गहाण ठेवले आहेत. पैशाच्या तंगीमुळे काही दागिने विकलेली आहेत. म्हणूनच त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदतीचा हातभार मिळावा अशी त्यांची अपेक्षा आहे.
संबंधित बातम्या :
बॉडीबिल्डिंगसाठी स्टेरॉइडचं अति प्रमाणात सेवन, 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू