मुंबई : लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या देवदूतांच्या मदतीला ‘सिद्धिविनायक’ धावून आला. श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाकडून पोलिसांना जेवण, पाणी यांची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. (Siddhivinayak Temple Trust Helps Mumbai Police)
लॉकडाऊनच्या काळातही पोलिस आपलं कर्तव्य चोख पार पाडत आहेत. अशावेळी तहानभूक हरपून ते काम करतात. मात्र अन्न पाण्याअभावी त्यांची गैरसोय होऊ नये, म्हणून देवाने दानपेटी उघडली आहे.
मुंबई पोलिसांना मदतीचा हात म्हणून ‘श्री सिद्धिविनायक मंदिर न्यास’ धावून आला आहे. न्यासातर्फे लॉकडाऊनच्या काळात दादर, नायगाव, वरळी भागात कर्तव्यावर तैनात असलेल्या पोलिस आणि वाहतूक पोलिसांना जेवण, पाणी सुविधा उपलब्ध करुन दिली जात आहे. ‘श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासा’चे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी या कामात पुढाकार घेतला आहे.
Mumbai: Siddhivinayak Temple Trust yesterday distributed food and bottled water to police and traffic police personnel deployed on duty during lockdown in the city pic.twitter.com/28SkReVn6o
— ANI (@ANI) March 26, 2020
‘कोरोना’शी दोन हात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. या काळात केवळ जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठीच सर्वसामान्य नागरिकांना घराबाहेर पडण्यास मुभा आहे. 14 एप्रिलपर्यंत देशभरात लॉकडाऊनचा कालावधी असेल.
दरम्यान, पोलिस पित्याला घराबाहेर जाण्यापासून रोखणाऱ्या चिमुकल्याचा एक भावनिक व्हिडीओ नुकताच समोर आला. ‘पप्पा ड्युटीवर जाऊ नका प्लीज, बाहेर कोरोना आहे’ असं हा चिमुकला आपल्या ड्युटीवर जाणाऱ्या पोलिस वडिलांना रडून सांगत आहे. लेकराचा आकांत पाहून पित्याचाही नाईलाज होताना दिसतो.
‘साहेबांचा फोन आला होता’ असं म्हणत बाप लेकराला कडेवर घेतो आणि छातीशी कवटाळतो. मी दोनच मिनिटात जाऊन येतो, असं म्हणताना वडिलांचा पाय निघत नाही. कर्तव्य सर्वश्रेष्ठ असते, हे समजावताना त्यांच्या नाकी नऊ येत आहेत.
माणिक घोगरे हे पुणे पोलिसात कार्यरत आहेत. पुण्यात कोरोनाचा विळखा वाढत असल्याने अनेक पोलिस कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत.
Siddhivinayak Temple Trust Helps Mumbai Police