सायन रेल्वे पुलाचा पुनर्विकास लवकरच सुरु, या तारखेपासून तब्बल 2 वर्षे वाहतूकीसाठी बंद राहणार

| Updated on: Mar 24, 2024 | 2:30 PM

शीव म्हणजेच सायन स्थानकातील ब्रिटीशकालीन उड्डाण पुलाला पाडून त्या जागी नवीन पुलाची उभारणी होणार आहे. या पुलाचे पाडकाम लवकरच सुरु होत असून हा पुल वाहतूकीसाठी तब्बल दोन वर्षे बंद होणार आहे. त्यामुळे मुंबईत मोठी वाहतूक कोंडी होणार असल्याचे म्हटल जात आहे.

सायन रेल्वे पुलाचा पुनर्विकास लवकरच सुरु, या तारखेपासून तब्बल 2 वर्षे वाहतूकीसाठी बंद राहणार
SION FLYOVER
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

मुंबई : मुंबईतील ब्रिटीशकालिन सायन रेल्वे स्थानकावरील उड्डाण पुलाची पुनर्बांधणी केली जाणार आहे. येत्या 28 मार्चपासून तब्बल किमान दोन वर्षांसाठी हा पुल वाहतूकीसाठी बंद करण्यात येणार आहे. पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेसाठी या पुलाला पाडून त्याजागी नवा पुल बांधण्यात येणार आहे. या मार्च 27-28 च्या रात्रीपासून हा पुल वाहतूकीसाठी बंद केला जाणार आहे. याआधी या पुलाचे पाडकाम 20 जानेवारीपासून सुरु करण्यात येणार होते. परंतू स्थानिकांनी विरोध केल्याने आता 28 मार्चपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.

सायन रेल्वे स्थानकावरील या उड्डाण पुलाचे आयुष्य संपले आहे. तसेच मध्य रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेसाठी देखील या पुलाला पाडून नविन पुलाची उभारणी करण्याची गरज असल्याने या पुलाचे पाडकाम आधी जानेवारी महिन्यात घेण्यात आले होते. त्यास विरोध झाल्याने दुसरी तारीख 28 फेब्रुवारी निश्चित करण्यात आली. परंतू बारावी आणि दहावीच्या परीक्षा जवळ आल्याने या पुलाच्या पाडकामाची तारीख पुढे ढकल्यात आली होती. बारावीच्या परीक्षा मार्च 19 ला तर दहावीच्या परीक्षा 26 मार्च रोजी संपल्याने आता 28 मार्च पासून हा ब्रिटीशकालीन पुल तोडण्याच्या कामाला प्रारंभ होणार आहे.

सायन रेल्वे उड्डाण पुलाची उभारणी 24 महिन्यात करण्याची योजना आहे. जानेवारी 2026 पर्यंत हा पुल बांधून पूर्ण होईल अशी माहीती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. सायनचा हा पुल धारावी, एलबीएस रोड आणि पूर्व द्रुतगती महामार्गाशी कनेक्टेट आहे. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कुर्ला पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेसाठी अधिक जागा लागणार असल्याने जुना जर्जर पुल तोडून त्याजागी नवा पुल आणखी रुंद बांधावा लागणार आहे. या पुलाला वाहतूकीसाठी बंद केल्यानंतर इतर पूर्व आणि पश्चिम कनेक्टर्स सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोडवर वाहनांची गर्दी वाढणार आहे. सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड हा मार्ग पूर्व द्रुतगती महामार्ग ते एलबीएस रोड ते पुढे धारावीकडे कनेक्ट होतो.

नव्या पुलाचा स्पॅन 52 मीटरचा असणार

सायन रेल्वे उड्डाण पुलाचा सध्याचा स्पॅन 27 मीटरचा आहे. एक पिलर 13 मीटर तर दुसरा पिलर 14 मीटरचा आहे. नव्या पुलाचा स्पॅन अखंड 52 मीटरचा असणार आहे. त्यामुळे अतिरिक्त रेल्वे रुळांना टाकण्यासाठी जागा उपलब्ध होणार असल्याची माहीती मध्य रेल्वेच्या सूत्रांनी दिली आहे.