सहा मिस्ड कॉल आणि बँक खात्यातून 1 कोटी 87 लाख रुपये गायब

| Updated on: Jul 05, 2019 | 4:46 PM

मुंबई : मुंबईच्या माहिम परिसरातील एका व्यापाऱ्याच्या बँक खात्यातून एक कोटी 87 लाख रुपयांची चोरी झाली आहे. ही घटना 27-28 डिसेंबरच्या रात्री घडली. चोरी होण्यापूर्वी शाह यांना फोनवर सहा मिस्ड कॉल आले आणि त्यांच्या कंपनीच्या बँक खात्यातून तब्बल 1 कोटी 87 लाख रुपये काढले गेले. मिळालेल्या माहितीनुसार, ही चोरी सिम कार्ड स्वॅपच्या माध्यमातून झाली असल्याचा […]

सहा मिस्ड कॉल आणि बँक खात्यातून 1 कोटी 87 लाख रुपये गायब
Follow us on

मुंबई : मुंबईच्या माहिम परिसरातील एका व्यापाऱ्याच्या बँक खात्यातून एक कोटी 87 लाख रुपयांची चोरी झाली आहे. ही घटना 27-28 डिसेंबरच्या रात्री घडली. चोरी होण्यापूर्वी शाह यांना फोनवर सहा मिस्ड कॉल आले आणि त्यांच्या कंपनीच्या बँक खात्यातून तब्बल 1 कोटी 87 लाख रुपये काढले गेले. मिळालेल्या माहितीनुसार, ही चोरी सिम कार्ड स्वॅपच्या माध्यमातून झाली असल्याचा अंदाज पोलीसांनी वर्तवला आहे. सध्या अशा पद्धतीने मोबाईल युजर्सची फसवणूक केली जात आहे.

नेमकं काय झालं?

पीडित व्यापाऱ्याचे नाव शाह आहे. 27-28 डिसेंबरच्या रात्री 2 वाजताच्या सुमारास सहा मिस्ड कॉल आले होते. सकाळी जेव्हा शाह यांनी या नंबरवर कॉल केला तोपर्यंत त्याचे सिम डीअॅक्टीवेट झाले होते. त्यांनी सांगितले की, मिस्ड कॉल आलेल्या नंबरमध्ये एका नंबरची सुरुवात +44 ने होती. +44 सिरीजचा नंबर हा युनायटेड किंगडमचा कोड आहे.

शाहने जेव्हा आपल्या सिम कार्ड कंपनीसोबत संपर्क साधला, तेव्हा त्यांना सांगण्यात आले की, तुमच्या विनंतीवर आम्ही सिम कार्ड ब्लॉक केले आहे. तेव्हा शाह यांना संशय आल्यावर त्यांनी तातडीने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. तसेच शाह बँकेत गेले तेव्हा कळाले की, त्यांच्या बँक खात्यातून 1 कोटी 87 लाख रुपये काढले गेले आहेत. हे पैसे 14 वेगवेगळ्या बँक खात्यात असे 28 ट्रँझॅक्शन्सद्वारे ट्रान्सफर केले आहे. बँकेच्या प्रयत्नानंतर आतापर्यंत 20 लाख रुपये शाह यांच्या खात्यात पुन्हा जमा करण्यात बँकेला यश आले आहे.

27 डिसेंबरला रात्री 11.15 वाजता सिम कार्ड कंपनीकडे सिम रिप्लेसमेंटची रीक्वेस्ट आली होती. त्यानंतर 28 डिसेंबरला 2 वाजता रात्री सहा मिस्ड कॉल आले.

माझ्या कंपनीचं बँक खातं माझ्या नंबरसोबत जोडलेले आहे. पण मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की, माझ्या बँक अकाउंटमधून अशा पद्धतीने इतक्या सहज कोणी पैसे काढू शकेल, असे शाह यांनी मुंबई मिरर वृत्तपत्राशी बोलताना सांगितले.

वांद्रे कुर्ला संकुल सायबर क्राईम पोलीस स्टेशनमध्ये या घटनेबद्दल अज्ञातांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले, आम्हाला संशय आहे की, फसवणूक करणाऱ्या व्यक्तीकडे शाह यांच्या फोन नंबरचे अॅक्सेस होते. तेव्हाच त्यांनी सिम कार्ड बदलण्याची रिक्वेस्ट टाकली. शाह यांना याबद्दल काही माहिती आहे का नाही हे जाणून घेण्यासाठी त्यांनी रात्री फोन सायलेंटवर असताना कॉल केला.