मुंबई : राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी मुंबई लोकलमधून महिलांना प्रवास करण्याची परवानगी दिली होती. मात्र अनेक महिला आपल्या लहान मुलांसोबत प्रवास करत असल्याचं वारंवार समोर आलं होतं. या पार्श्वभूमीवर मुंबई लोकलमधून केवळ महिलांना प्रवासाची परवानगी दिलेली आहे. त्यांच्यासोबत लहान मुलांना प्रवासाची परवानगी नाही, असे खडसावले आहे. (Small Children Not Allowed In Mumbai Local With Female Passenger)
मुंबईतील मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी रेल्वेने मिशन बिगन अगेन अंतगर्त महिलांना लोकलमधून प्रवासाची मुभा दिली होती. मात्र अनेक महिला या आपल्या लहान मुलांसोबत लोकलमधून प्रवास करतात, ही बाब रेल्वेच्या लक्षात आली. त्यामुळे आता लहान मूल घेऊन प्रवास करणाऱ्या महिलेला लोकल प्रवासाची परवानगी दिली जाणार नाही.
यानुसार मुंबईतील प्रत्येक रेल्वे स्टेशनच्या गेटवर एक आरसीएफ जवान तैनात करणार आहे. आरसीएफ जवान महिलांसोबत मुलं नाहीत, याची खात्री करेल. जर त्या महिलेसोबत लहान मुलं आढळून आले, तर त्या महिलेला प्रवासाची परवानगी मिळणार नाही. तिला रेल्वे स्थानकातून पुन्हा घरी पाठवले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.
कोरोनामुळे लॉकडाऊनदरम्यान मुंबई लोकल रेल्वे 22 मार्चपासून बंद होती. त्यानंतर अनलॉकिंग झाल्यानंतर अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना लोकलमधून प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर 17 ऑक्टोबरपासून महिलांना मुंबई लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी मिळाली होती. महिलांना सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत तर संध्याकाळी 7 नंतर पुढे प्रवास करता येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे त्यासाठी क्यूआर कोडची आवश्यकता नाही, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. (Small Children Not Allowed In Mumbai Local With Female Passenger)
संबंधित बातम्या :
महिलांना उद्यापासून मुंबई लोकलने प्रवास करण्याची मुभा, वेळेची मात्र मर्यादा
मुंबई लोकल सुरु करण्याचा निर्णय 15 डिसेंबरनंतरच, मुंबई महापालिका आयुक्तांचं स्पष्टीकरण