मुंबई : समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री शिंदे पहिल्यांदाच सार्वजनिक मंचावर आले. यावेळी मोदींनी शिंदेंच्या पाठीवर कौतुकाची थापही मारली. पण ठाकरे गटानं संताप व्यक्त केला. खंजीर खुपसून शिवसेना फोडल्यानंच थाप मारली, अशी टीका राऊतांनी केलीय. त्यानंतर राऊतांना मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलंय. समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाची जेवढी चर्चा रंगली, तितकीच चर्चा मोदींनी मुख्यमंत्री शिंदेंना दिलेल्या या शाबासकीची सुरु आहे.
यावरुनच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी शिंदेंवर निशाणा साधला. खंजीर खुपसून शिवसेना फोडली म्हणून मोदींनी शिंदेंना कौतुकाची थाप दिली का ?, अशी बोचरी टीका राऊतांनी केलीय.
नागपुरात समृद्धी महामार्गाचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन झालं. उद्घाटनानंतर फोटो सेशन सुरु होतं. त्याचवेळी मोदींनी बाजूला असलेल्या मुख्यमंत्री शिंदेंना आणखी जवळ घेतलं आणि शिंदेंच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.
त्यानंतर शिंदेंनी मोदींना नमस्कार केला. पुन्हा मोदींनी शिंदेचा हात हातात घेतला. मात्र यावरुनच राऊतांनी शिंदेंवर खंजीरचा आरोप लावून, टीकास्त्र सोडलंय.
फडणवीस मुख्यमंत्री असताना, त्यांनी समृद्धी महामार्गाची जबाबदारी शिंदेंना दिली होती. विशेष म्हणजे युतीचं सरकार असतानाही, त्यावेळी शिवसेनेच्या नेतृत्वाचा समृद्धी महामार्गाला कसा विरोध होतो, हे स्वत: शिंदेंनीच मोदींच्या समोर सांगितलं.
पण विरोध असतानाही फडणवीसांनी दिलेली जबाबदारी शिंदेंनी यशस्वीपणे पार पाडली. आणि आता स्वत: शिंदेच मुख्यमंत्री असताना समृद्धी महामार्गाचं उद्घाटन झालं. त्यामुळं मोदींनीही मुख्यमंत्री शिंदेंना कौतुकानं पाठीवर थाप दिली असावी. पण या कौतुकाला ठाकरे गटानं, शिवसेना फुटीशी जोडून खंजीरवरुन टीका केली.