मुंबई : यंदाची दहीहंडी (Dahihandi 2022) उत्साहात सुरू आहे. मात्र या उत्सवाला गालबोटही लागत आहे. दहीहंडी उत्सवादरम्यान ही दहीहंडी फोडताना थरांवरून कोसळून गोविंदा जखमी (Govinda injured) होत आहेत. आतापर्यंत विविध गोविंदा पथकांतील 12 गोविंदा जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. या 12 जखमी गोविंदांपैकी 5 जणांवर उपचार करण्यात आले आणि त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 7 जण रुग्णालयात दाखल असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. मुंबईतील विविध रुग्णालयांत सध्या जखमी (Treatment in hospital) गोविंदा उपचार घेत आहेत. दहीहंडी फोडताना थरांवर थर रचले जातात. त्यावरून कोसळून अनेक गोविंदा दरवर्षी जखमी होत असतात. काहींना तर आपले प्राणही गमवावे लागतात. त्यामुळे योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत.
मुंबईत ठिकठिकाणी दहीहंडी फोडण्यासाठी लाखोंचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. त्यामुळे बक्षीस मिळवण्यासाठी थरावर थर रचले जातात. त्यातून अशा गोविंदा जखमी होण्याच्या घटना घडतात. तर जखमी गोविंदांवर मोफत उपचार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच दिले होते. गोविंदांचा 10 लाखांचा विमाही काढण्यात आला आहे. दहीहंडी उत्सवाला खेळाचा दर्जा दिला जाईल, तसेच गोविंदांनाही सरकारी सेवा भरतीत 5 टक्के कोटा दिला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.
विविध राजकीय पक्षांतर्फे मुंबई-ठाणे परिसरात मोठमोठ्या दहीहंडींचे आयोजन करण्यात आले आहे. नऊ थरांपर्यंत गोविंदा पोहोचून ही हंडी फोडत असतात. मात्र अनेकवेळा यांत ते जखमीही होतात. थर कमी करण्यासंदर्भात ठोस नियम होण्याची गरज व्यक्त होत आहे. दुपारी एक वाजेपर्यंत 12 गोविंदा जखमी झाले होते. त्यात जसा कार्यक्रमाचा फिव्हर वाढत जाईल, तशी वाढही होण्याची शक्यता आहे. गिरगाव मनसे, टेंभी नाका, संस्कृती दहीहंडी, वरळी, शिवसेनेची दहीहंडी अशा विविध मोठ्या दहीहंडीत गोविंदा पथके येत आहेत.