सागर सुरवसे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, सोलापूर | 17 जानेवारी 2024 : लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आहे. अशात सगळ्याच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे.लोकांना आपल्या बाजूने करण्यासाठी काँग्रेसनेही ग्राऊंड लेव्हलवर प्रयत्न सुरु केले आहेत. सोलापुरात काँग्रेसने स्थानिक पातळीवर निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे ॲक्टिव्ह मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे. या लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी विशेष प्लॅन केल्याचं दिसतं आहे. आज सकाळीच सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापुरात फेरफटका मारला आणि स्थानिकांशी संवाद साधला.
सुशीलकुमार शिंदे यांनी आज सकाळी मॉर्निंग ग्रुपच्या कट्ट्यावर ‘चाय पे चर्चा’ केली. सोलापुरातील ज्येष्ठ पत्रकार, उद्योजक व्यापारी तसेच एसटी आणि खाजगी नोकरदारांसोबत ‘चाय पे चर्चा’ त्यांनी केली सुशीलकुमार शिंदे हे वीस दिवसांपासून सोलापुरात ठाण मांडून आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुशील कुमार शिंदे अॅक्टिव्ह मोडमध्ये पाहायला मिळतायेत. यावेळी सुशील कुमार शिंदे यांनी चहाचा आस्वाद घेत बिस्कीटावर ताव मारला. यावेळी अनेक सामाजिक आणि राजकीय विषयावर त्यांनी चर्चा केली.
जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं. त्यावर सुशीलकुमार शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते जितेंद्र आव्हाड यांचं मत असेल. मात्र डॉक्टर बाबासाहेबांनी जी घटना दिली. त्यामध्ये त्यांना माहिती होते की ज्युडीसिअरीमध्ये आरक्षण द्यावे की नाही द्यावं.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चिंतन करून ते केलेलं आहे. त्यावर भाष्य करणं योग्य नाही. मात्र जी घडलेली घटना आहे त्याविषयी मी भाष्य करणे योग्य नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चिंतन करून ते केलेलं आहे. त्यावर भाष्य करणं योग्य नाही, असं शिंदे म्हणाले.
पंतप्रधान मोदी यांच्या सोलापूर दौऱ्यावरही सुशीलकुमार शिंदे यांनी भाष्य केलं आहे. मोदींचं स्वागत करण्यासाठी जाण्याचा प्रश्न येत नाही. मोदीजी येत असलेला कार्यक्रम हा विशिष्ट कार्यकर्त्यांचा आहे. मात्र उगाच खाजवून खरूज काढण्याचा माझा स्वभाव नाही. त्यामुळे मी ते टाळतो, असं सुशीलकुमार शिंदे म्हणाले.