मुंबईः महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची माफियागिरी सुरू असून, त्यांनी माझ्यावर 12 आरोप लावले आहेत, पण कितीही चौकशी करा. सत्य आमच्या बाजून आहे, असा घणाघाती हल्लाबोल बुधवारी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला. सोमय्या यांची आज आयएनएस विक्रांत (INS Vikrant Case) प्रकरणाच्या कथित घोटाळ्यात सलग तिसऱ्या दिवशी चौकशी होत आहे. चौकशीला जाण्यापूर्वी त्यांनी जोरदार बॅटिंग केली. याप्रकरणात भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आपल्या पाठिशी असल्याचे सांगायलाही ते विसरले नाहीत. दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोमय्या यांच्यावर टॉयलेट घोटाळ्याचा आरोप केला आहे. याप्रकरणीही सोमय्यांना अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी पळापळ करावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. एकंदर भाजप विरुद्ध शिवसेनेमध्ये रंगलेला हा सामना पुढे कोणते वळण घेतो हे पाहावे लागेल.
आयएनएस विक्रांत प्रकरणी मुंबई पोलिसांनी सुरू केलेल्या चौकशीचा आज तिसरा दिवस आहे. या चौकशीला जाण्यापूर्वी किरीट सोमय्या यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, मला देवेंद्र फडणवीस निर्धास्त रहा म्हणाले. सत्य तुमच्या बाजूने आहे. जेवढे तास तुमची चौकशी करायची आहे, तेवढी करू द्या, असे म्हणत त्यांनी माझ्या पाठिशी असल्याचे सांगितले, असा दावा त्यांनी केला.
भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्यावर एक डझन आरोप लावलेले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे हे कशाप्रकारे माफियागिरी करतात, हे आता लोकांना कळेल. संजय राऊत केवळ खोटे बोलतात. त्यांच्यामध्ये पुरावे देण्याचे हिंमत नाही. आपण चौकशीला सामोरे जावू. आपल्या पाठिशी सत्य असल्याने कशाचीही भीती नाही, असा दावाही त्यांनी यावेळी केला.
आयएनएस विक्रांत प्रकरणी किरीट सोमय्या यांची सलग चार दिवस चौकशी होणार आहे. त्यामुळे त्यांना उद्या गुरुवारीही पोलिसांसमोर हजेरी लावावी लागणार आहे. सोमय्या यांनी कालही हजेरी लावली होती. काल ते म्हणाले होते की, मुंबई पोलिसांना हवी असलेली सर्व माहिती मी त्यांना देत आहे.पण यांना 57 कोटी तर सोडा यांना 57 लाखांचा आकडाही मिळत नाही. न्यायालयात ज्यावेळी युक्तीवाद झाला, त्यावेळी मला अटक करण्याची मागणी करत होते. त्यावेळी न्यायालय म्हणाले तुमच्याकडे त्या व्यवहाराची पुरेशी माहिती नाही. तर तुम्ही अटक कशी करू शकता. त्यामुळे न्यायालयाने यांना चौकशीसाठी चार दिवसांचा वेळ दिला आहे.