मुंबई : ग्रामपंचायत निवडणुकीत कोणच्या पक्षानं किती जागा जिंकल्या याबाबत अजूनही सत्ताधारी महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, त्याचबरोबर भाजपचे दावे सुरुच आहेत. गावपातळीवर आम्हीच सर्वात मोठा पक्ष ठरल्याचं या पक्षांचे नेते छातीठोकपणे सांगत आहेत. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह शिवसेनेचे अनेक नेते, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांच्यासह भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्याच पक्षानं सर्वाधित ग्रामपंचायती जिंकल्याचं आवर्जुन सांगितलं. हे सगळं एकीकडे सुरु असताना दिल्लीत सत्ताधारी असलेल्या आम आदमी पक्षानंही राज्यात विविध ग्रामपंचायतीमध्ये मिळून 145 जागा जिंकल्या आहेत. इतकच नाही तर लातूर जिल्ह्यातील दापक्याळ या गावासह अन्य तीन गावांमध्ये एकहाती सत्ताही मिळवली आहे.(Aam Aadmi Party’s performance in Maharashtra Gram Panchayat elections)
लातूर जिल्ह्यातील दापक्याळ हे छोटं गाव आहे. 7 सदस्यसंख्या असलेल्या या ग्रामपंचायतीत आम आदमी पक्षानं 5 जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली आहे. आपचे लातूर जिल्हाध्यक्ष प्रताप भोसले यांच्या नेतृत्वाखाली ही ग्रामपंचायत निवडणूक लढवण्यात आली. त्यात त्यांना मोठं यशही मिळालं. ही ग्रामपंचायत निवडणूक जिंकल्यानंतर आपच्या महाराष्ट्र युवा शाखेचे अध्यक्ष अजिंक्य शिंदे यांनी ट्वीट करत पक्षाध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना टॅग केलं. अरविंद केजरीवाल यांनीही या ट्विटला मराठीतून प्रतिसाद देत कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
‘विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन! जनतेनं आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाला सार्थ करा, जनतेची सेवा करा, पुढील कार्यास शुभेच्छा’, अशा शब्दात अरविंद केजरीवाल यांनी दापक्याळच्या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांना शुभेच्छा दिल्या आहे.
विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!
जनतेने आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाला सार्थ करा, जनतेची सेवा करा. पुढील कार्यास शुभेच्छा. https://t.co/F89YnNX6ZQ
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) January 18, 2021
आम आमदी पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रताप भोसले हे दापक्याळ याच गावचे. या निवडणुकीबाबत आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार दापक्याळ ग्रामपंचायतीवर गेल्या 40 वर्षांपासून एकाच कुटुंबाची सत्ता होती. एकाच घरातील व्यक्ती सातत्यानं सरपंच, उपसरपंच पदावर असायचा. असं असतानाही गेल्या 40 वर्षात गावाला विकास नावाचा शब्दच माहिती नव्हता. गावातील रस्ते कायम अंधारलेले. गावात मोठं तळ असूनही गावाला पाणी मिळत नाही. या तळ्याचं पाणी आजूबाजूच्या गावांना मिळतं. अशा परिस्थितीत आम्ही गावातील नागरिकांना काहीतरी वेगळं करुन दाखवण्याची इच्छा बोलून दाखवल्याचं भोसले यांनी सांगितलं.
‘त्यासाठी निवडणुकीपूर्वी गावातील लोकांशी चर्चा केली. गावासाठी वेगळं आणि नवं काहीतरी करुन दाखवण्याची तळमळ त्यांच्यापुढे व्यक्त केली. नव्या चेहऱ्यांना संधी द्या हशी हाक गाववाल्यांना घातली. त्यावेळी गावातील नागरिकांचंही म्हणणं आलं की आम्ही तुमच्यासारख्या लोकांचीच वाट पाहत होतो. पुढे आम्ही आमच्या उमेदवारांची यादी तयार केली. त्यात सर्व उमेदवार सुशिक्षित दिले. ती यादी आम्ही गावकऱ्यांना दाखवली. त्या उमेदवारांबाबत गाववाल्यांचं मत घेतलं. गावातील लोकांनीही आमच्या उमेदवारांना पसंती दिली आणि त्यांना निवडून आणलं’, असं भोसले यांनी अभिमानाने सांगितलं.
महत्वाची बाब म्हणजे आम आदमी पक्षाच्या पॅनलचा दापक्याळ ग्रामपंचायत निवडणुकीचा खर्च अवघा 5 हजार रुपये आहे. या उमेदवारांनी प्रचार यंत्रणेत गावकऱ्यांना कुठलंही आमिष दाखवलं नाही. त्याउलट तुम्ही काहीतरी करुन दाखवत आहात. तुमची तळमळ आम्हाला दिसतेय. त्यामुळे तुमचं काही आम्हाला नको. फक्त गावासाठी काही करुन दाखवा, असं भोसले यांना सांगितलं होतं. आता पुढील 2 ते 3 वर्षात दापक्याळ गावचा कायापालट करुन दाखवू आणि आमच्या राष्ट्रीय नेत्याला दापक्याळ गावची दखल घ्यायला लावू, असा विश्वास आपचे जिल्हाध्यक्ष प्रताप भोसले यांनी केला आहे.
एकीकडे दापक्याळ सारख्या गावात ग्रामपंचायत निवडणुकीतील एकहाती विजय मिळवला आहे. तर दुसरीकडे आम आदमी पक्षाचे राज्यभरात 300 उमेदवार उभे केले होते. त्यातील तब्बल 145 सदस्य निवडून आले आहेत. तशी माहिती आपच्या महाराष्ट्रातील नेत्या प्रिती मेनन यांनी ट्वीट करुन दिली आहे. महत्वाची बाब म्हणजे गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागातही आपचे 66 पैकी 28 उमेदवार निवडणूक जिंकले आहेत.
Congratulations @AAPMaharashtra our #GramPanchayat win tally is now 145/300! And we have full majority in 4 villages
This is a historic entry and it shows that the whole country is keen to have @ArvindKejriwal‘s model of governance in their villages and towns.— Preeti Sharma Menon (@PreetiSMenon) January 23, 2021
याबाबत आम्ही आम आदमी पक्षाचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांच्याशी चर्चा केली. तेव्हा आम आदमी पक्षाची शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सुरु असलेल्या लढाईमुळेच राज्यात ग्रामीण भागात आपला चांगलं यश मिळाल्याचं शिंदे यांनी सांगितलं.(Aam Aadmi Party’s performance in Maharashtra Gram Panchayat elections)
>> केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाविरोधात आम आदमी पक्षानं घेतलेली कठोर भूमिका
>> केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आंदोलक शेतकऱ्यांना ठेवण्यासाठी दिल्लीतील 9 स्टेडियम मागितली होती. त्याला अरविंद केजरीवाल यांनी दिलेला नकार.
>> दिल्लीच्या सीमेवर आंदोलनाला बसलेल्या शेतकऱ्यांना जेवण, त्यांच्यासाठी आरोग्य व्यवस्था, कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सॅनिटायझेशन, शेतकऱ्यांनी रिलायन्सचे टॉवर उखडून टाकल्यामुळे त्यांच्यासाठी वायफायची सोय.
>> अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या विधानसभेत कृषी विधेयक फाडून टाकले
यामुळे राज्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आम आमदी पक्षाबद्दल एक विश्वास निर्माण झाला. त्यातूनच मग कासवाच्या गतीनं का होईना पण महाराष्ट्र नवनिर्माण पक्षासारख्या मोठ्या पक्षाला मागे टाकत आपने ग्रामपंचायत निवडणुकीत जास्त जागा मिळवल्याचं धनंजय शिंदे म्हणाले. आम आदमी पक्षाला मिळालेल्या या जागा, आपच्या उमेदवारांचा विजय म्हणजे शेतकऱ्यांनी आपवर दाखवलेला विश्वास आणि कृषी विधेयकाविरोधातील आपच्या भूमिकेचा सन्मान असल्याची प्रतिक्रिया शिंदे यांनी दिली आहे.
आम आदमी पक्षाने महाराष्ट्रात 2014 च्या लोकसभा निवडणुका लढवल्या होत्या. त्यावेळी सर्व 288 विधानसभा मतदारसंघात आम्ही मतं मागितली. वातावरण असूनही आपच्या उमेदवारांना त्यावेळी कमी मतं मिळाली. त्यानंतर 2014 ते 2019 या दरम्यान आम्ही महाराष्ट्रात एकही निवडणूक लढवली नाही. 2019 मध्ये राज्यातील पक्षाची सूत्र हाती घेतल्यानंतर निवडणुका लढण्याचा निर्णय आम्ही घेतला. राजकारणाबद्दलची उदासिनता असलेला तरुण वर्ग आपच्या माध्यमातून राजकारणात येत असेल तर ती एक संधी आहे. आणि महाराष्ट्रात राजकारण करायचं झालं तर ग्रामीण भागात पाय रोवायला हवे असं मला वाटलं. त्यामुळे आधी संघर्ष, संघटन आणि मग निवडणुका या प्रमाणे लढण्याचा आम्ही निश्चय केला, असं रंगा राचुरे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितलं.
आम्ही 2019ची विधानसभा निवडणूक लढवली. तेव्हा आमच्या उमेदवारांना मिळालेली मतांची टक्केवारी ही 2014 प्रमाणेच होती. त्यामुळे आपचा मतदार आहे, पण जमिनीवर काम करण्याची गरज असल्याचं आमच्या लक्षात आलं. पुढे कोरोनाचं संकट उभं राहिलं. या संकटाच्या काळात आम्ही गावागावात काम करायचं ठरवलं. वेगवेगळ्या पद्धतीनं काम करत असताना आम्ही 3 जूनपासून वीजबिलाविरोधात आंदोलन सुरु केलं. मुख्यमंत्र्यांनी जनतेला फसवून मतं घेतली म्हणून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करायचं ठरवलं. साधारणपणे 200 ते 210 पोलीस ठाण्यात आम्ही गुन्हे दाखल केले. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक नवी उर्जा आणि विश्वास निर्माण झाल्याचंही राचुरे म्हणाले.
याकाळात जिल्हा पातळीवर केलेल्या आंदोलनाला विदर्भात मोठा प्रतिसाद मिळाल्याचंही राचुरे म्हणाले. पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर आणि कोल्हापूर, मराठवाड्यात औरंगाबाद, हिंगोली, जालना आणि लातूरसारख्या ठिकाणी लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. संघटनेला रचनेची जोड दिली नाही तर त्याला अर्थ उरत नाही. संघटन उभं करायचं असेल तर ग्रामीण भागातून निवडणूक लढवण्याचा निर्णय झाला.
राज्यभरात साधारणपणे 500 हून अधिक उमेदवार आम आदमी पक्षानं दिले. त्यातील काहींनी माघार घेतली. त्यातील 300 जणांनी निवडणूक लढवली आणि गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल हाती आल्यानंतर राज्यभरात आपचे 145 ग्रामपंचायत सदस्य निवडणूक आल्याची माहिती राचुरे यांनी दिली आहे.
शहरी पक्ष अशी छाप पडली तर मिडलक्लास वर्गापुढे आपण जाऊ शकत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील शक्ती उभा करु शकलो तर पुढे जिल्हा परिषद निवडणुका सोप्या जातील आणि त्यासाठी आम्ही आतापासूनच तयारी सुरु केल्याचं राचुरे म्हणाले. त्यासाठी स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांना जनतेच्या कामासाठी पूर्ण स्वातंत्र्य दिलं आहे. अधिकार मिळतोय या भावनेपोटी कार्यकर्तेही कामाला लागतात. त्यातूनच आता कोल्हापूर महापालिका आणि औरंगाबाद महापालिका निवडणूक आम आदमी पक्ष लढणार असल्याची घोषणाही रंगा राचुरे यांनी केली आहे.
संबंधित बातम्या :
Aam Aadmi Party’s performance in Maharashtra Gram Panchayat elections