मुंबई : अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आगलेल्या आगीमुळे सरकारी रुग्णालयातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. नगरमधील जिल्हा रुग्णालयालातील अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत सुरुवातीला 10 जणांचा मृत्यू झाला होता. तर 1 रुग्ण गंभीर जखमी झाला होता. मात्र, उपचारादरम्यान त्या रुग्णाचाही मृत्यू झाल्याने मृतांची संख्या आता 11 वर पोहोचली आहे. अशावेळी रुग्णालयातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. (A series of accidents in hospitals in Maharashtra continues, Who is responsible for patient safety?)
कोरोना प्रादुर्भावाच्या काळात राज्यात अनेक रुग्णालयात आग लागण्याचा, ऑक्सिजन गळतीसारख्या अनेक दुर्घटना घडल्या आहेत. त्यात नाशिकमधील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय, भंडारा जिल्हा रुग्णालय आग, कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाला लागलेली आग, नागपुरातील वेल्ट्रिट कोविड केअर सेंटरला लागलेली आग, आदी घटनांमुळे आरोग्य विभागाच्या मर्यादा सातत्याने पुढे येत आहेत.
नाशिकमध्ये डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टँकमध्ये गळती होऊन रुग्णालयातील 24 कोरोना रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. 21 एप्रिल रोजी ही भीषण दुर्घटना घडली होती. त्या काळात राज्यात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन तुटवडा भासत होता. अशावेळी नाशिकच्या रुग्णालयात ऑक्सिजन गळतीमुळे झालेल्या दुर्घटनेनंतर संपूर्ण राज्यात एकच खळबळ माजली होती. दरम्यान, या प्रकरणाच्या चौकशी अहवालात ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे 24 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.
21 एप्रिल दुपारी 12.30 च्या सुमारास रुग्णालयात ऑक्सिजनची गळतीचा प्रकार घडला होता. यानंतर काही तास रुग्णालयात गोंधळ पाहायला मिळाला. रुग्णालयात व्हेंटिलेटवर असलेले अनेक रुग्ण हे ऑक्सिजन अभावी तडफडत होते. तर दुसरीकडे ही गळती थांबवण्यासाठी प्रशासनाकडून अथक प्रयत्न केले जात होते. जवळपास एक दीड तासानंतर ही ऑक्सिजन गळती थांबवण्यात आली. या रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरु होते. त्यात 150 लोक व्हेंटिलेटरवर होते. त्यातील 24 जणांचा मृत्यू झाला होता.
विरारमधील कोविड रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात 23 एप्रिल 2021 रोजी भीषण आग लागली होती. त्यात 13 रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला होता. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागवल्याची शक्यता त्यावेळी वर्तवण्यात आली होती. त्यावेळी अतिदक्षता विभागात एकूण 17 रुग्णांवर उपचार सुरु होते. त्यापैकी 13 रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले होते.
विरार पश्चिम भागात विजय वल्लभ कोव्हिड केअर रुग्णालय आहे. या रुग्णालयातील अतिदक्षता (ICU) विभागात पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली होती. यावेळी रुग्णालयात 90 जण उपचार घेत होते. आयसीयू वॉर्डमध्ये जवळपास 17 रुग्णांवर उपचार सुरु होते. त्यापैकी 13 जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. आग लागली, त्यावेळी आयसीयूमध्ये वैद्यकीय स्टाफ नसल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला. डॉक्टरांनी मात्र अवघ्या दोन मिनिटात आग भडकल्याचा दावा करत आरोप फेटाळून लावले होते.
9 जानेवारी रोजी भंडारा जिल्हा रुग्णालयातील दुर्घटनेमुळं संपूर्ण देश हादरला होता. जिल्हा रुग्णालयातील शिशू केअर युनिटला मध्यरात्री आग लागली होती. या आगीत 10 नवजात बालकांचा मृत्यू झाला होता. त्यात 8 मुली तर 2 मुलांचा समावेश होता. या आगीत 3 बालकांचा होरपळून तर 7 बालकांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला होता. दरम्यान, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे 7 बालकांना वाचवण्यात यश आलं होतं. या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. त्यानुसार विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीनं केलेल्या तपासात रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे आग लागल्याचं समोर आलं होतं.
कोल्हापूर जिल्हा रुग्णालय सीपीआर (छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय) येथील ट्रामा केअर विभागात 28 सप्टेंबर 2020 रोजी आग लागली होती. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. आग लागली त्यावेळी वॉर्डात 16 रुग्ण होते. त्यावेळी सेवेवर असलेले डॉक्टर्स, नर्सेस, वर्ग चारमधील कर्मचारी आणि महाराष्ट्र सुरक्षा बल यांचे सुरक्षा रक्षक यांनी प्रसंगावधान राखून कोरोनाची पर्वा न करताना जीवाची बाजी लावत 16 रुग्णांना अन्य कक्षात स्थलांतरित केलं.
स्थलांतरित केलेल्या रुग्णांना आयसीयूमध्ये योग्य उपचार तातडीने देण्यात आले. उपचार सुरु असतानाच काही काळानंतर जे रुग्ण अतिगंभीर होते त्यापैकी तीन रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यात ट्रामा केअरमधील 1 तर अन्य कक्षातील दोघांचा समावेश होता.
भांडूपमधील ड्रीम मॉलमधील कोविड रुग्णालयात 26 मार्च रोजी रात्री 12 च्या सुमारास भीषण आग लागली होती. या आगीत रुग्णालयातील 11 कोरोना रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्यावेळी राज्यभरातील मॉल्स आणि अन्य इमारतींमध्ये तात्पुरत्या स्वरुपात कोविड रुग्णालये सुरु करण्यात आली होती. अशा सर्व ठिकाणचे फायर ऑडिट करण्याचे निर्देश त्यावेळी देण्यात आले होते.
नागपूरमधील वाडी इथल्या वेल्ट्रिट कोविड केअर सेंटरला 9 एप्रिल रोजी आग लागल्याची घटना घडली होती. त्यावेळी रुग्णालयातील रुग्णांना तातडीने अन्य रुग्णालयात हलविण्यात आले होते. अग्नीशमन दल आणि पोलिसांच्या मदतीनं संपूर्ण रुग्णालय रिकामं करण्यात आलं होतं. मात्र, या आगीत 4 रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला होता.
इतर बातम्या :
Sierra Leone Blast: इंधन टँकर विस्फोटात किमान 91 जणांचा मृत्यू; सिएरा लिओनमध्ये भयंकर अपघात
A series of accidents in hospitals in Maharashtra continues, Who is responsible for patient safety?