मुंबई : ऐरोली ते कल्याण-डोंबिवलीचे अंतर दहा किलोमीटरने कमी करणाऱ्या ऐरोली ते कटाई नाका या 12.3 कि.मी.च्या एलिवेटेड रोडचे काम महत्वाच्या टप्प्यावर आले आहे. रविवारी या उन्नत मार्गाला राज्य महामार्ग क्र.4 ओलांडण्यासाठी मुंब्रा- शिळफाटा दरम्यान विशेष ब्लॉक घेऊन गर्डरचे लाँचिंग झाले आहे, आता पुढचा ब्लॉक रविवार, दि.25 डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे.
एमएमआरडीच्यावतीने ऐरोली ब्रिज – पारसिक – शिळफाटा – कटाई नाका हा 12.3 कि.मी. लांबीचा सहा पदरी फ्री वे बांधण्याचे काम सुरू आहे. 944 कोटीचा हा प्रकल्प असून पारसिक डोंगरात यासाठी 1.7 कि.मी. लांबीचे दोन बोगदे खणण्याचे काम सुरू आहे.
ठाणे ते बेलापूर मार्गावरील कोंडी कमी होणार आहे. बेलापूरहून मुंबई ते वाशी रोडने पुण्याला महामार्ग क्र.4 वरून जाण्यासाठी 18 कि.मी.चा वळसा घालावा लागतो. या रस्ता प्रकल्प उन्नत मार्गाच्या पहील्या फेजमध्ये राज्य महामार्ग क्र.4 ओलांडण्यासाठी मुंब्रा- शिळफाटा दरम्यान 63 मीटर लांबीचे स्टीलचे 8 गर्डर उभारण्यात येणार आहेत. या गर्डरच्या उभारणीसाठी रविवारी 18 डिसेंबरला विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेतला गेला होता.
आता दुसरा ब्लॉक येत्या रविवारी, दि. 25 डिसेंबर रोजी रा. 00:01 वा. पासून 21:59 वा. पर्यंत असणार आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्य महामार्ग क्र. 4 वर मुंब्रा – शिळफाटा दरम्यानची अवजड वाहनांची वाहतूक बंद ठेवण्यात येणार असून ती इतर पर्यायी मार्गांनी वळविली जाईल. तसेच मुंब्रा येथील वाय जंक्शन उड्डाणपूल देखील वाहतुकीसाठी बंद ठेवला जाणार असून इतर वाहतूक उड्डाणपूला खालून सुरू ठेवण्यात येईल.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत ऐरोली-कटाई नाका रस्ता प्रकल्पाचे काम विस्तारित मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पांतर्गत हाती घेण्यात आलेले असून या प्रकल्पाची लांबी 12.3 कि.मी. इतकी आहे. तसेच हा प्रकल्प -3 भागांत प्रगतीपथावर आहे. हा पूर्णतः उन्नत असून भारत बिजलीजवळ या भागात उड्डाणपूलाची उंची साधारणतः जमिनीपासून 15 मीटर इतकी असेल. तसेच या 8 गर्डरचे एकूण वजन अंदाजीत 650 मेट्रिक टन इतके आहे.
ऐरोली ते कटाई नाका फ्रीवेच्या कामासाठी गेल्या रविवारी मुंब्रा- शिळफाटा दरम्यान 18 डिसेंबरला पहिला ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात आला. त्यात एकूण चार गर्डर उभारण्यात आले. आता दुसरा ट्रॅफीक ब्लॉक येत्या रविवारी, दि. 25 डिसेंबरला घेतला जाणार आहे. याब्लॉकमध्ये आता उर्वरित चार गर्डर उभारले जाणार आहेत. अशा प्रकारे एकूण आठ गर्डर उभारले जाणार आहेत.
या महत्वपूर्ण अभियांत्रिकी कामामध्ये क्रेनच्या सहाय्याने दोन गर्डर एकाचवेळी उचलले जातील. या दोन गर्डरचे एकत्रित वजन सुमारे 160 ते 190 मेट्रिक टन इतके असेल. या गर्डर उभारणीसाठी A – 750 टन क्षमतेच्या क्रॉलर क्रेन, तसेच डायाफ्राम जोडणीसाठी 2 अतिरिक्त क्रेन वापरल्या जातील अशी माहिती एमएमआरडीएने दिली आहे.
ऐरोली – कटाई नाका रस्ता प्रकल्पातील हा अवघड पण महत्त्वाचा टप्पा आहे. या गर्डरची उभारणी पूर्ण झाल्यावर प्रकल्पाचे बहुतांशी काम पूर्ण होईल. तसेच पारसिक बोगद्याचे काम सुध्दा प्रगतीपथावर असून त्याचे काम 66 % टक्के पूर्ण झाले आहे, अशी माहिती एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एस. व्ही.आर. श्रीनिवास यांनी दिली.