मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचा दर महिन्याच्या सात तारखेला होणारा पगार अलिकडे चांगलाच रखडत चालला आहे. या महिन्याची बारा तारीख उलटूनही पगार न झाल्याने कर्मचारी संतप्त झाले असताना अखेर सरकारला उपरती होत शुक्रवारी दुपारी सरकारने तीनशे कोटीचा निधी वळता केला आहे. मात्र हा निधी अपुरा आहे. यातून कामगारांचे नुकसानच असल्याचा आरोप आरोप महाराष्ट्र एस.टी.कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे.
एसटी महामंडळालाचा तोटा दिवसेंदिवस वाढतच असून महामंडळ आर्थिक अडचणीत सापडले आहे. त्यातच महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी 2021 च्या दिवाळीपासून संप सुरू केला. तो प्रचंड लांबल्याने त्यातच कोरोनासंकट त्यामुळे महामंडळ आणखीनच अडचणीत आले आहे. संपकाळात न्यायालयाने त्रिसदस्यीय समिती नेमली होती. त्या समितीसमोर वेतनासाठी चार वर्षे पूर्ण रक्कम देण्याचे तसेच प्रत्येक महिन्याच्या 7 ते 11 तारखे दरम्यान वेतन देण्याचे सरकारच्यावतीने न्यायालयात मान्य केले होते. पण या महिन्याची १२ तारीख उलटून गेली तरी सरकार कडून निधी न मिळाल्याने व कर्मचाऱ्यांना वेतन मिळाले नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला होता.
त्यातच सरकारने आज फक्त 300 कोटी रुपयांचा निधी महामंडळाला दिला असून तो अपुरा असल्याने त्यातून नक्त वेतन होणार आहे. पीएफ, ग्राजुटी व बँक कर्ज ही देणी प्रलंबित राहणार असून त्या मुळे सरकारने पुन्हा वाटाण्याच्या अक्षता लावण्याचा प्रकार केला आहे असा आरोप महाराष्ट्र एस.टी.कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे.
नवे सरकार आल्यापासून कामगार कामगारांची पीएफ, ग्रॅज्यूटी , बँक कर्ज व इतर मिळून 978 कोटी रुपयांची रक्कम थकली असून वेतनावर अवलंबून असलेल्या विविध संस्था अडचणीत सापडल्या आहेत. या महिन्याच्या 2 तारखेला 950 कोटी वेतनासाठी मिळावेत असा प्रस्ताव मंत्रालयातील अर्थ खात्याकडे एसटी महामंडळाने पाठवला होता. त्यावर अर्थ खात्यातील अधिकारी निर्णय घ्यायला तयार न्हवते. कर्मचाऱ्यांचा असंतोष पाहून आज त्या वर निर्णय घेण्यात आला .पण 950 कोटीपैकी फक्त 300 कोटी रुपये इतका निधी सरकार कडून एसटी महामंडळाला मिळाला असून,या अपुऱ्या निधी मुळे पुन्हा बँक, पीएफ , ग्रॅज्यूएटी आणि इतर रक्कम देणी प्रलंबित राहणार आहेत. सरकार वारंवार कर्मचाऱ्यांची व महामंडळाची फसवणूक करीत असल्याचे बरगे यांनी म्हंटले आहे