मुंबई: कोरोना महामारीमुळं गेल्या 8 महिन्यांपासून सर्वसामान्य मुंबईकरांसाठी लोकल बंद आहे. मात्र, आता मुंबईकरांना दिलासा देण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. 15 डिसेंबरपासून सर्वांसाठी लोकल सेवा सुरु करण्याचा विचार सरकार करत आहे. तशी माहिती मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिली आहे. सर्वांसाठी लोकल कधी सुरु होणार? याची वाट मुंबईकर चाकरमाणी पाहत होता. अशा चाकरमाण्यांना आता दिलासा मिळण्याची शक्यता आहे.(State government plans to start local for all after 15 December)
दिवाळीसारख्या मोठ्या सणामध्ये लोकांचा गावी प्रवास झाला. मोठ्या प्रमाणात गाठीभेटी झाल्या. त्यामुळे दिवाळीनंतर कोरोना रुग्णांची संख्या वाढेल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यामुळे सर्वांसाठी लोकल सुरु करण्याचा निर्णय दिवाळीनंतर घेतला जाईल, असं सांगण्यात आलं होतं. त्यानुसार अजून दोन आठवडे कोरोनाचा संसर्ग आणि रुग्णांच्या संख्येवर लक्ष दिलं जाणार आहे. त्याचबरोबर बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या प्रवाशांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे अजून काही दिवस संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवलं जाईल. त्यानंतर 15 डिसेंबरच्या पुढे लोकलबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती चहल यांनी दिली आहे.
दिवाळीनंतर कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात होती. मात्र, गेल्या दोन आठवड्यातील आकडेवारी पाहिली तर मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे सर्वांसाठी लोकल सुरु करण्याचा निर्णय होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
“राज्य सरकारने आपल्या राज्यात येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध लादले आहेत. त्यामुळे जर कोणाला मुंबई किंवा महाराष्ट्रात यायचं असेल, तर कोरोना चाचणीचा रिपोर्ट दाखवणे बंधनकारक असणार आहे. मुंबईत सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रवासी विमान आणि रेल्वे येत असतात. पालिका प्रशासन त्याची अंमलबजावणी करत आहे. त्यामुळे कोणालाही कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट नसेल, तर मुंबईत घेतलं जाणार नाही,” असे मुंबई महापालिका आयुक्तांनी स्पष्ट केलं.
“मुंबईतील रेल्वेच्या स्टेशनवरही तपासणी सुरू केली आहे. मुंबईत सध्या कोरोनाची स्थिती ही नियंत्रणात आहे. बेड योग्य प्रकारे उपलब्ध आहेत. त्यामुळे कोरोनाची लाट येईल की नाही हे माहीत नाही. पण पालिकेने याचे नियोजन सुरू केले आहे. त्यामुळे आता लोकांनी जे नियम दिले ते पाळणं गरजेचे असणार आहे,” असेही इक्बालसिंग चहल म्हणाले.
संबंधित बातम्या:
मुंबई लोकल सुरु करण्याबाबत वेट अँड वॉच भूमिका, परिस्थिती पाहून निर्णय घेऊ : पालिका आयुक्त
मुंबई लोकलमधून खासगी सुरक्षारक्षकांनाही प्रवासाला मुभा, राज्य सरकारच्या विनंतीनंतर रेल्वेची परवानगी
State government plans to start local for all after 15 December