मुंबई : मुंबईसह राज्याभरात जोरदार पाऊस बरसत आहे. मुंबईत तर रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे रस्ते, रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. सर्व लोकल अत्यंत धीम्या गतीने धावत आहेत. लोकल वाहतुकीचा फटका जसा सर्वसामान्य मुंबईकरांना बसला तसाच तो आमदार आणि मंत्र्यांनाही बसला.
वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण हे अधिवेशनाला लवकर पोहोचावं म्हणून लोकल ट्रेनने मंत्रालयाकडे निघाले. मात्र ट्रॅकवर पाणी भरल्याने मंत्रीमहोदय लोकलमध्येच अडकून पडले. जवळपास दोन तास रवींद्र चव्हाण गर्दीत ताटकळत उभे होते. अधिवेशनाला लवकर पोहोचायचं होतं, मात्र लोकलमध्ये त्यांना अधिकच वेळ लागला. त्यामुळे सर्वसामान्य चाकारमानी रोज कोणत्या त्रासाला सामोरं जातात, ते मंत्रिमहोदयांना आज चांगलंच समजलं असेल.
राष्ट्रवादीचे आमदारही ट्रेनमध्ये अडकले
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे जालन्याचे आमदार आणि माजी मंत्री राजेश टोपे हे सुद्धा ट्रेनमध्ये अडकले. राजेश टोपे जालन्यावरुन रेल्वेने मुंबईत अधिवेशनाला येत होते. मात्र मध्य रेल्वेवर सायन परिसरात ट्रॅकवर पाणी साचल्याने लांब पल्ल्याच्या लोकलही रखडल्या. त्यामुळे आमदार राजेश टोपे हे सुद्धा ट्रेनमध्येच बसून राहिले.
मुसळधार पावसामुळे मुंबईसह इतर ठिकाणी अनेक ठिकाणी पाणी साचले. आज (1 जुलै) मराठवाडा, विदर्भ, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातही रेड अर्लट देण्यात आला आहे. त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
विस्कळीत लोकलचा राज्यमंत्र्यांना फटका, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण लोकलमध्ये अडकले, अधिवेशनाला लवकर जाण्यासाठी रेल्वे प्रवास, मात्र ट्रॅकवर पाणी आल्याने रेल्वे रखडली, मंत्रिमहोदय प्रवाशांसोबत ताटकळत @DombivlikarRavi pic.twitter.com/jz1xyt2Vfj
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 1, 2019