राज्यातील ‘मयत’ सातबारा आता ‘जिवंत’ होणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही अनोखी मोहीम राबवण्याचे आदेश दिले आहे. सातबारा वरील सर्व मयत खातेदारांच्या ऐवजी वारसांची नावे नोंदवण्यात येणार आहे. येत्या १० मे पर्यंत राज्यातील सर्व सातबारा अद्ययावत करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सर्व जिल्ह्यात ‘जिवंत सातबारा मोहीम’ राबविण्याचे आदेश देण्यात आले आहे. तहसीलदारांची समन्वय अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांची नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्तीचे आदेश देण्यात आले आहे. मयतांची नावे सातबाऱ्यावरून हटवून त्यांच्या वारसदाराची नावे सातबारावर लावण्यात येणार आहे. राज्यातील सातबारा अद्ययावत होणार आहे.
बुलडाणा पॅटर्न सर्व राज्यात
सातबाऱ्यावरील मयतांच्या नावांमुळे अनेकांना खरेदी-विक्री व्यवहार, कर्ज प्रकरणात अडचणी येत होत्या. ही अडचण दूर करण्यासाठी महसूल विभागाने १०० दिवसांचा कृती कार्यक्रम हाती घेतला आहे. जिवंत सातबारा मोहीम राबवण्यात येणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याविषयीचे आदेश दिले आहे.
बुलडाणा जिल्ह्यात १ मार्चपासून जिवंत साताबारा मोहीम राबवण्यात आली आहे. हीच मोहीम आता राज्यभरात १ एप्रिलपासून सुरू होत आहे. जिवंत साताबारा मोहिमेअंतर्गत साताबार उताऱ्यातील गावातील सर्व मयत खातेदारांच्या वारसांची नोंदीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. या मोहिमेमुळे वारसांना येणारी अडचण दूर होणार आहे.
कशी असेल ‘जिवंत सातबारा मोहीम’?
– १ ते ५ एप्रिल दरम्यान तलाठी हे गावात चावडी वाचन करतील.
– न्यायप्रविष्ट प्रकरण सोडून गाव निहाय मयत खातेदारांची यादी तयार करतील.
– ६ ते २० एप्रिल दरम्यान वारसा संबंधित कागदपत्रे तलाठींकडे सादर करता येतील.
– स्थानिक चौकशी करून मंडळ अधिकारी हे वारस ठराव ई-फेरफार प्रणाली मध्ये मंजूर करतील.
– २१ एप्रिल ते १० मे दरम्यान तलाठी यांनी ई-फेरफार प्रणाली मध्ये वारस फेरफार तयार करावा.
– त्यानंतर मंडळ अधिकाऱ्यांनी वारस फेरफारवर निर्णय घेऊन सातबारा दुरूस्त करावा.
– जेणेकरून मयत व्यक्तीच्या ऐवजी सातबारावर जिवंत व्यक्तींची नावे येतील.