अध्यक्षाने अपशब्द वापरल्यानेच विद्यार्थ्याची आत्महत्या; कोल्हापुरातील आंतरराष्ट्रीय शाळेतील आत्महत्याप्रकरणावर उच्च न्यायालयाचे ताशेरे

| Updated on: May 17, 2022 | 7:27 PM

शाळकरी विद्यार्थ्याला अपशब्द आणि अर्वाच्च भाषेचा वापर केल्यानेच विद्यार्थ्याने आत्महत्या केली असल्याचे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विनय जोशी यांनी निकाल देताना नोंदवले आहे.

अध्यक्षाने अपशब्द वापरल्यानेच विद्यार्थ्याची आत्महत्या; कोल्हापुरातील आंतरराष्ट्रीय शाळेतील आत्महत्याप्रकरणावर उच्च न्यायालयाचे ताशेरे
एफआयआर दाखल केल्याशिवाय पोलीस चौकशी नाही
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबईः कोल्हापुरातील आंतरराष्ट्रीय शाळेतील (kolhapur International School) अध्यक्षाच्या अटकपूर्व जामीन अर्जावर (Pre-arrest bail application) निकाल देताना मुंबई उच्च न्यायालयाकडून (Mumbai High Court) गंभीर ताशेरे ओढले आहेत. तसेच अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. शाळकरी विद्यार्थ्याला अपशब्द आणि अर्वाच्च भाषेचा वापर केल्यानेच विद्यार्थ्याने आत्महत्या केली असल्याचे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विनय जोशी यांनी निकाल देताना नोंदवले आहे.

कोल्हापूरातील सिम्बॉलिक इंटरनॅशनल स्कूलमध्ये (Symbolic International School kolhapur) 1 एप्रिल 2022 रोजी दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यांकडून फुटबॉल खेळताना एका मुलीला फूटबॉल लागला. त्यावर संताप व्यक्त करत शाळेचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी त्या विद्यार्थ्याला कठोर शब्दांत सुनावलं. “तू नायालक आहेस, तू कधीच सुधारणार नाहीस, झोपडपट्टीछाप आहेस, तुझ्यासारख्या प्रवृत्तीच्या मुलांना जगण्याचा अधिकार नाही.

जगावर तुम्ही भार आहात

जगावर तुम्ही भार आहात. या जगात राहण्याचा तुम्हाला अधिकार नाही,” अशा अपमानकारक भाषेचा त्यांनी वापर केला. तसेच इथंवर न थांबता अध्यक्षांनी मुलाच्या आजोबांना फोन करून शाळेत बोलावून घेतले, आणि त्यांच्यासमोर पुन्हा त्या मुलाला खडे बोल सुनावले. इतकंच काय तर “तुमच्या नातवाला घेऊन जा आणि शाळेतून काढून टाका’ असा खोचक सल्लाही आजोबांना देण्यात आला. त्या अपमानानंतर त्या मुलाने घरी जाताच अवघ्या काही तासांत आत्महत्या करुन आपले आयुष्य संपवले.

अध्यक्षांची मुंबई उच्च न्यायालयात धाव

त्यानंतर मुलाच्या घरच्यांनी शाळेतील अध्यक्षांविरोधात शिरोळी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. कोल्हापूर पोलिसांनी त्यानुसार अध्यक्षांवर आयपीसी आणि बाल न्याय कायद्यानुसार कलम 305, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यामुळे शाळेतील अध्यक्षांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला.

गैरवर्तन केल्याच्या अनेक तक्रारी

प्रत्येक प्रकरण हे त्यामागील वस्तुस्थिती आणि परिस्थितीवर अवलंबून असतं. एखाद्या व्यक्तीनं दुसऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त केले आहे की नाही, हे केवळ त्या प्रकरणातील तथ्यांवरून समजतं. कारण, आत्महत्येमागे अप्रत्यक्ष कृतीही असू शकते. या प्रकरणात असं दिसून येतंय की, याचिकाकर्त्यांच्या विरोधात विद्यार्थ्यांशी गैरवर्तन केल्याच्या अनेक तक्रारी यापूर्वीही पालकांकडून आलेल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणात त्यांचं म्हणणे आक्षेपार्ह आहे, असं निरीक्षण नोंदवता येईल.

अर्वाच्च शब्दांत खडसावलं

तसेच याचिकाकर्त्याने मुलाच्या आजोबांच्या उपस्थितीतही अर्वाच्च शब्दांत त्याला खडसावलं होतं. त्यामुळे प्रथमदर्शनी असे दिसून येते की, त्या खडसावण्यामुळेच विद्यार्थ्याच्या मनावर निराशेची छाप पडली आहे. या घटनेनंतरच काही तासांत मुलानं टोकाचे पाऊल उचलून आपलं जीवन संपवलेलं आहे.

मुलांच्या नाजूक मनाला धक्का

शिक्षक विद्यार्थ्यांना त्यांच्या चुकांवरून फटकारू शकतात परंतु, त्यानं मुलांच्या नाजूक मनाला धक्का लागेल किंवा त्यांचे कोवळे मन विचलित होणार नाही, याचंही भान शिक्षकांनी राखायला हवं असही न्यायालयाने निरीक्षण नोंदवले आहे. याचिकाकर्त्यांच्या या कृत्यामुळे एका विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागला, हे विसरूनही चालणार नाही. तसेच या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे. त्याबाबतच्या चौकशीसाठी आरोपीची कोठडीत आवश्यक असल्याचं नमूद करत हायकोर्टानं गणपतराव पाटील यांना अटकेपासून कोणतंही संरक्षण देण्यास नकार देत त्यांची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळून लावली.