गेल्या दोन ते तीन दिवसांपासून भाजप आणि शरद पवार यांच्यातील वाकयुद्ध रंगलं आहे. दोन्ही पक्षांनी एकमेकांवर हल्लाबोल केला आहे. तर आता राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुद्धा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. शरद पवार यांचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न जनतेने मदत न केल्याने तडीपार झाले. पंतप्रधान पद तर दूर ते गृहमंत्री पण होऊ शकले नाही. केवळ 7 जागांवर त्यांना कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंतचा पुढारी व्हायचा टोला त्यांनी लगावला.
आरक्षणावर भूमिका स्पष्ट करावी
नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना, मराठा आरक्षणासंदर्भात शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसने त्यांची भूमिका स्पष्ट करावी. राज्य सरकार तर थेट चर्चेस तयार आहे. त्यांनी पण भूमिका स्पष्ट करणे गरजेचे आहे. सरकार मनोज जरांगे पाटील आणि ओबीशी नेत्यांशी वारंवार चर्चा करत आहेत. मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिले. महाविकास आघाडीने आरक्षणासंदर्भात सकारात्मक निर्णय घेतला नाही. आता तरी त्यांनी ओबीसीविषयीची त्यांची भूमिका स्पष्ट करावी. महाविकास आघाडीला तर दोन्ही समाजात वाद निर्माण करायचा आहे. मराठा समाजाला ओबीसीतून की स्वतंत्र आरक्षण द्यायचे याविषयी महाविकास आघाडीने भूमिका जाहीर करावी, असे मुनगंटीवार म्हणाले.
विरोधकांवर तिखट प्रतिक्रिया
ओबीसी, मराठा समाजासह विरोधी पक्षासोबत चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे. पण विरोधक चर्चेपासून वाचत आहे. ते चर्चेवर बहिष्कार टाकत असल्याचा आरोप मुनगंटीवार यांनी केला. याविषयी शरद पवार यांनी भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन त्यांनी केले. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची आमची भूमिका असल्याचे ते म्हणाले.
सत्तेसाठी जातीचा आधार
वनमंत्रीने विरोधी पक्षावर सत्तेसाठी जातीचा आधार घेत असल्याचा हल्लाबोल केला. ही राजकारणासाठी धोक्याची घंटा आहे. लोकसभा निवडणुकीत आम्ही सजग नव्हतो आणि विरोधकांनी खोटे नरेटीव्ह पसरवले. संविधान बदलणार, मनुस्मृती लागू करणार असल्या गोष्टी पसरविण्यात आल्याने त्याचा फटका बसला. विरोधकांच्या या आरोपांना प्रत्युत्तर देण्याचे आवाहन त्यांनी केले.