मुंबई : जालन्यातील निर्भयावर मुंबईत झालेल्या बलात्काराचे (Mumbai Gang rape) पडसाद राज्यभर उमटत आहेत. मागील 2 दिवसांमध्ये 3 मुलींवर बलात्काराच्या घटना झाल्या आहेत. आज जालन्याच्या निर्भयाची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपुरी पडली आणि तिचा मृत्यू झाला. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) महाजनादेश यात्रेत (MahaJanadesh Yatra) गुंग आहेत. त्यांनी जालन्यात असून या बलात्कार पीडितेविषयी एक शब्दही काढला नाही, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली आहे.
मुंबईत सामूहिक बलात्कार झालेल्या जालन्यातील 19 वर्षीय तरुणीचा 2 महिन्यांनी अखेर आज (29 ऑगस्ट) उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी या मुद्द्यावर आक्रमक होत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल केले आहेत. सुप्रिया सुळे म्हणाल्या, “महाराष्ट्रामध्ये मागील 2 दिवसांमध्ये 3 मुलींवर बलात्कार झाले. आज एका मुलीचा मृत्यू देखील झाला. ती मुलगी जालन्याची होती. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महा जनादेश यात्रेसाठी आज (29 ऑगस्ट) जालन्यातच आहेत. मात्र, त्यांनी या घटनेचा उल्लेख देखील केला नाही. यावरुन हे सरकार किती असंवेदनशील आहे हे स्पष्ट होतं.”
मुंबईत अत्याचार झालेल्या जालन्याच्या निर्भयाला न्याय मिळवून देण्यासाठी 30 ऑगस्टला राष्ट्रवादी चुनाभट्टी पोलीस स्टेशनवर मोर्चा काढणार आहे. सुप्रिया सुळे यांनी याबाबत माहिती दिली. त्या म्हणाल्या, “दिल्लीतील निर्भयाप्रमाणेच ही घटना आहे. मात्र, आरोपी अजूनही फरार आहेत. चुनाभट्टी पोलीस आरोपीला पकडण्यात अपयशी आहेत. त्यांनी पीडितेच्या कुटुंबीयांनी देखील गैरवर्तन केले आहे. म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस याविरोधात चुनाभट्टी पोलीस स्टेशनवर मोर्चा काढेल.